Jalna Loksabha : जालना लोकसभेचे (Jalna Loksabha) महायुतीचे उमदेवार रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. संभाजीनगरमधील पळशी गावात प्रचारासाठी रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आल्याने मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी भाजप कार्यकर्ते आणि मराठा आंदोलक आमने सामने आले. दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी सुरू होती. यावेळी उपस्थित असलेल्या पोलिसांना यावेळी हस्तक्षेप करावा लागला. यावेळी भाजप आमदार हरिभाऊ बागडे देखील उपस्थित होते.


जालन्यात रावसाहेब दानवे विरुद्ध कल्याण काळे 


जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार रावसाहेब दानवे यांना पुन्हा एकदा मैदानात उतरवले आहे. तर काँग्रेस पक्षाकडून कल्याण काळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोन्ही उमेदवारांमध्ये तगडी फाईट असतानाच अपक्ष उमेदवारही मैदानात उतरला आहे. मराठा आरक्षणासाठी स्वत:ची चारचाकी जाळणाऱ्या आणि वकिल गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडी फोडण्याचा आरोप असलेले मंगेश साबळे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दरम्यान, मनोज जरांगे यांच्या समर्थकांनी मंगेश साबळेंना जाब विचारला होता. निवडणुकीत मनोज जरांगेंच्या नावाचा वापर करायचा नाही, असं मनोज जरांगेंच्या समर्थकांनी सुनावलं होतं. 


जालन्यात मनोज जरांगेंचा प्रभाव


जालना लोकसभा मतदारसंघात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा असलेला प्रभाव रावसाहेब दानवे यांच्यासाठी डोकेदुखी ठरु शकतो. कारण मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी वारंवार आंदोलने केले. त्यानंतर जरागेंनी फडणवीसांवर खळबळजनक आरोपही केले होते. मात्र, जरांगेंविरोधात एसआयटी स्थापन केल्यामुळे मराठा समाज नाराज झाला होता. त्यामुळे जरांगेंवर चौकशी समिती नेमल्याने भाजपला त्याचा मोठा फटका बसू शकतो. जालन्यात मराठा आरक्षणासाठी लढणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांविरोधात मतदान होऊ शकते. 


तिरंगी लढतीचा फायदा कोणाला ?


अपक्ष मंगेश साबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने जालन्यात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. मात्र, मंगेश साबळेंचा फायदा रावसाहेब दानवेंना होणार की, कल्याण काळेंना याबाबत चर्चा सुरु आहे. त्यातच जरांगेंनी आवाहन केले आहे की, मराठा आरक्षणला विरोध करणाऱ्यांना असं पाडा की, त्यांच्या सात पिढ्या पुन्हा निवडणुकीला उभ्या नाही राहिला पाहिजेत. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी आग्रही असलेला वर्ग लोकसभा निवडणुकीत कोणाला मतदान करणार ? याकडे सर्वांचे लक्ष आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Ajit Pawar on Narendra Modi : युक्रेनचं युद्ध थांबवण्यासाठी मोदींनी पुतीनला फोन लावला, हे कुण्या येड्या गबाळ्याचं काम नाही, अजित पवारांकडून कौतुकाचा वर्षाव