Madha Vidhansabha Election : पुढच्या काही दिवसातच विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) राज्यात आचारसंहितेची घोषणा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. माढा विधानसभा (Madha Vidhansabha) मतदारसंघातही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. अशातच यामध्ये आणखी एक मोठं नाव सामील झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. 


माढ्यातून रणजितसिंह मोहिते पाटील निवडणूक लढवणार?


राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र आणि भाजपचे विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) हे माढा विधानसभेतून शरद पवार गाटकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. याबाबतचे संकेत रणजितसिंह मोहिते पाटील यांचे बंधू शिवतेजसिंह मोहिते पाटील (Shivtesinh Mohite Patil) यांनी दिले आहेत. माढा विधानसभा मतदारसंघात रोज नवनवीन वेगवान घडामोडी घडत आहेत. आता मोहिते पाटील कुटुंबातील कोणीही विधानसभा रिंगणात उतरावे अशी जोरदार मागणी कार्यकर्त्यांकडून होऊ लागल्याचे शिवतेसिंह मोहिते पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. माढ्यात उमेदवार कोण असणार? असे विचारले असता भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि मी हे एकच असून पवारसाहेब यावर निर्णय घेतील अशी भूमिका शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी बोलून दाखवली. 


अकलूजमधील कार्यक्रमात रणजितसिंह मोहिते पाटलांची हजेरी  


सध्या शरद पवार हे भाजपला रोज वेगवेगळे धक्के देत आहेत. अशातच आता भाजपकडून विधानपरिषद आमदार असणारे रणजितसिंह मोहिते पाटील हे माढ्यातून तुतारी चिन्हावर निवडणूक लढवू शकतात असे थेट संकेत मिळाले आहेत. तसे पाहता खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या माढा लोकसभा निवडणुकीच्या वेळी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पडद्यामागून सर्व सूत्र हलवली होती. माढा लोकसभा भाजपकडून जिंकून आपल्या भावाला खासदार केले होते. यानंतर खऱ्या अर्थाने आमदार रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्येच राहणार की भाजप सोडणार या चर्चेला सुरुवात झाली होती. मात्र चार दिवसापूर्वी शरद पवार यांच्या अकलूज येथील कार्यक्रमात रणजितसिंह मोहिते पाटील यांनी स्टेजवर हजेरी लावून भाषण करताना सोलापूर जिल्ह्यासाठी कोणतीही तडजोड करायला तयार आहे असे संकेत देत भाजपला सोडचिठ्ठी द्यायची तयारी दर्शवली होती. 


शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील जो निर्णय घेतील तो मान्य


सध्या माढा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांची उमेदवारी शरद पवार निश्चित करतील अशी चर्चा असताना आता थेट मोहिते पाटील विधानसभेच्या रिंगणात उतरायची तयारी करू लागल्याने पवारांसमोरही नवीन ट्विस्ट उभा राहिला आहे. माढा विधानसभा मतदारसंघातून मोहिते पाटील कुटुंबातील एकाने उभारावे ही जनतेची मागणी असून त्यासाठीचा दबाव वाढू लागल्याचे आज शिवतेसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले. आपण गेले दोन ते तीन वर्ष माढा विधानसभेचे काम पाहत असून ज्या पद्धतीने माढ्यात लोकांचा आग्रह वाढत चाललेला आहे ते पाहता ही बाब आपण शरद पवार जयंत पाटील विजयसिंह मोहिते पाटील यांच्या कानावर घातल्याचे त्यांनी सांगितले. वास्तविक काल माढा विधानसभेसाठी च्या मुलाखती पुण्यात झाल्या होत्या. यावेळी मोहिते पाटील यांनी मुलाखत दिली नव्हती. आपण पक्षाकडे जाहीर उमेदवारी मागितली नव्हती. मात्र, लोकांचा आग्रह वाढत चालल्याने आता ही बाब आपण कुटुंबाच्या आणि पक्षाच्या कानावर घालणार असून यानंतर शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल असे त्यांनी सांगितले. 


 56 हजार विद्यार्थ्यांना तुतारी वाजवणारा माणूस असलेल्या वह्यांचे वाटप 


गेल्यावेळी तुतारी चिन्हाच्या बरोबर पिपाणी चिन्ह दिल्याने अनेक जणांचा संभ्रम झाल्याचे निदर्शनास आले आहे. आजपासून शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी माढा विधानसभा मतदारसंघातील 56 हजार विद्यार्थ्यांना तुतारी वाजवणारा माणूस असलेल्या वह्यांचे वाटप करण्यास सुरुवात केली आहे. आपल्या पक्षाचे चिन्ह जास्तीत जास्त कुटुंबापर्यंत पोहोचावे यासाठी हा मार्ग निवडला असून लोकांना तुतारी वाजवणारा माणूस हे शरद पवार गटाचे चिन्ह आहे हे समजणे यामागचा उद्देश असल्याचे शिवतेसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले. 


शरद पवार रणजितसिंह मोहिते पाटील यांना संधी देणार का? 


आता पुन्हा माढा विधानसभा मतदारसंघात मोहिते पाटलांची एन्ट्री झाल्यास पवार भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना संधी देणार का? अभिजीत पाटील यांच्या पाठीमागे उभे राहणार की शेवटी विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांच्या मुलाला उमेदवारी देऊन इतर ठिकाणचे राजकीय फायदे पाहणार हे लवकरच समोर येणार आहे. मात्र सध्या तरी मोहिते पाटलांनी पहिल्यांदाच उघडपणे माढा विधानसभेत आपली इच्छुकता दाखवल्याने माढ्याचा तिढा आणखीन वाढत जाणार आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Sharad Pawar: माढ्यात शिंदे कुटुंबाकडे तुतारी सोपवून शरद पवार 'या' तीन मतदारसंघातील राजकारण कसं साधणार?