Navneet Ravi Rana Vs Shiv Sena: मुंबई पोलिसांनी आज खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी यांना न्यायालयात हजर केले. या दोघांवर धार्मिक भावना भडकावल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहिता 124 अ अंतर्गत राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज वांद्रे येथील महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयाने नवनीत राणा आणि रवी राणा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यानंतर आता त्यांची तरुंगात रवानगी होणार आहे. तत्पूर्वी राणा दाम्पत्याची कोरोना चाचणी करण्यात आली. आताच मिळालेल्या माहितीनुसार, त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.
नवनीत राणा आणि रवी राणा यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. यानंतर आता त्यांची तुरुंगाच्या दिशेने रवानगी करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रवी राणा यांना तळोजा तुरुंगात तर, नवनीत राणा यांना भायखळा तुरुंगात ठेवण्यात येऊ शकतं. तत्पूर्वी रवी राणा यांना आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली होती. आर्थर रोड तुरुंगात नवीन कैद्यांसाठी जागा शिलक्क नसल्याने त्यांना तळोजा तुरुंगात ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे.
हनुमान चालिसावरून महाराष्ट्राचे राजकारण तापले
खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी शनिवारी सकाळी 9 वाजता मातोश्रीवर जाणार असल्याचे जाहीर केले होते. तसेच मातोश्रीबाहेर हनुमान चालिसाचे पठण करणार असल्याचे ते म्हणाले होते. नवनीत राणा म्हणाल्या होत्या की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे हिंदुत्वामुळे आपल्या पदावर आहेत, पण त्यांनी आता आपली विचारधारा सोडली आहे. दरम्यान, नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 153 (A) (धर्म, जात, जन्मस्थान, निवासस्थान, भाषा इत्यादी कारणांवरून वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे) आणि कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यासोबतच त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.