Ramesh Pardeshi पुणे : आगामी काळात राज्यात होऊ घातलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या (Nagar Parishad and Nagar Panchyat) पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर नवीन राजकीय समीकरणे आकाराला येत आहेत. तर दुसरीकडे ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराचा मुद्दा प्रचंड चर्चेचा विषय ठरला आहे. अशातच आता 'मुळशी पॅटर्न' चित्रपट फेम पिट्या भाई अर्थात अभिनेते रमेश परदेशी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंची साथ सोडत भाजपचे कमळ हाती घेतले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) आणि भाजपचे नेते व मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत रमेश परदेशी यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे.
Ramesh Pardeshi : 'मी माझ्या विचारांसोबत राष्ट्रप्रथम' फेसबुक पोस्ट चर्चेत
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना संघाच्या गणवेशावरून राज ठाकरेंनी रमेश परदेशी यांना खडे बोल सुनावल्याची चर्चा होती. त्यानंतर आता थेट रमेश परदेशी यांनी एक सूचक फेसबुक पोस्ट केली होती. संघाच्या गणवेशातील फोटो पोस्ट करत लिहिलेली ही पोस्ट लक्षवेधी ठरली. 'मी माझ्या विचारांसोबत राष्ट्रप्रथम' असं लिहीत त्यांनीही पोस्ट केली होती. त्यामुळे रमेश परदेशी भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगली होती. अशातच आता रमेश परदेशींच्या भाजप पक्ष प्रवेशाने या सर्व चर्चांना आता पूर्णविराम लागला असून पुण्यात भाजपने मनसेला पुन्हा एक धक्का दिला आहे.
Ramesh Pardeshi Joins BJP : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार मला खुणावत होते, म्हणून...
जय महाराष्ट्र, मी लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मा. राज ठाकरे साहेब यांच्यासोबत मी गेले वीस वर्षे काम करत आहे. मात्र सध्या बदललेली परिस्थिती, कलाकारांना आणि मराठी सिनेमांना न्याय देण्यासाठी आणि कुठेतरी माझ्यावरती असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार मला खुणावत होते. म्हणून मी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्याप्रमाणे कणखर देश चालवत आहेत. मराठी सिनेमा आणि त्याच्याशी संबंधित असलेला ज्या काही अडचणी असतील त्या राज्य शासनाने केंद्राच्या माध्यमातून मी सोडवण्याचा प्रयत्न करेल. असेही रमेश परदेशी म्हणाले.
कोण आहेत रमेश परदेशी? (Who is Ramesh Pardeshi?)
अभिनेते रमेश परदेशी यांनी चित्रपटांमधून अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी पडद्यावर साकारलेला खलनायक अधिक गाजला. मात्र, त्यांना खरी ओळख मिळवून दिली ती ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाने. या चित्रपटात त्यांनी साकारलेली ‘पिट्या भाई’ ही भूमिका विशेष गाजली होती. या चित्रपटाने त्यांच्या आयुष्याला आणि करिअरला एक वेगळी दिशा मिळवून दिली. या आधी रमेश परदेशी ‘रेगे’, ‘देऊळबंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘बेरीज वजाबाकी’ आणि अजय देवगण याच्या ‘सिंघम’ या चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केले आहे.
हेही वाचा