मुंबई : महायुतीच्या जागावाटपात (Mahayuti Seat Sharing) एकीकडे रिपब्लिकन पक्षाला (Republican Party of India) एकही जागा दिली जात नसताना दुसरीकडे मनसेला (MNS) जागा देण्याची चर्चा सुरू आहे. महायुतीच्या या निर्णयामुळे आठवले गटाचे कार्यकर्ते (Ramdas Athawale) नाराज असल्याचं दिसतंय. त्यामुळे मनसेला जागा दिल्यास कोणती वाट धरायची आणि कुणाची वाट लावायची याचा निर्णय घेण्यासाठी आठवले गटाकडून गुरूवारी पुण्यात राज्यस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.
रिपब्लिकन पक्षाच्या या महत्वपूर्ण बैठकीस आठवले गटाचे राज्यातील पदाधिकारी आणि राज्य कार्यकारिणीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाने आयोजित केलेल्या या राज्यस्तरीय बैठकीकडे सर्व राजकीय धुरीणांचे, राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. या महत्वपूर्ण बैठकीत रिपाई कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जागावाटपात रिपब्लिकन पक्षाकडे दुर्लक्ष
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून राज्यात महायुतीचा घटक पक्ष असतानाही रिपब्लिकन पक्षाकडे जागावाटपात दुर्लक्ष झालेले आहे. त्यात भर म्हणून रिपब्लिकन पक्षाने केलेल्या विरोधाला न जुमानता भाजपने आता मनसेला सोबत घेण्याचा आटापिटा केला आहे. यामुळे रिपब्लिकन कार्यकर्त्याच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम भाजपकडून केलं जात असल्याचा आरोप रिपाई कार्यकर्त्यांनी केला आहे.
महायुतीच्या जागावाटपात मनसेला एक किंवा दोन जागा देण्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामध्ये दक्षिण मुंबई आणि शिर्डी या जागांची चर्चा आहे. या आधी रामदास आठवले यांनी शिर्डी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती.
अशा परिस्थित राज्यभरात अनेक जिल्ह्यात रिपब्लिकन कार्यकर्त्यानी आपल्या तीव्र भावना समाजमाध्यमांवर व्यक्त केल्या आहेत.रिपब्लिकन कार्यकर्त्यांची भावनिकता ओळखून रामदास आठवले यांनी तातडीने गुरुवार, 28 मार्च रोजी रिपब्लिकन पक्षाच्या राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन केले आहे.
मनसेला सोबत घेतल्यास वेगळी वाट धरणार?
या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपात रिपब्लिकन पक्षाचा वाटा किती? तसेच महायुतीत मनसेला वाटा दिल्यास रिपब्लिकन पक्षाने कोणती वाट धरायची आणि कोणाची वाट लावायची यावर रिपाईच्या राज्यस्तरीय बैठकीत विचार विनिमय होणार आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात रिपाई काय भूमिका घेणार याची उत्सुकता आहे. त्यामुळे रिपाइईच्या राज्यस्तरीय बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
ही बातमी वाचा: