Raju Patil Tweet : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर केलेल्या टीकेला आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी उत्तर दिलं आहे. आमदार राजू पाटील याबाबत ट्वीटच्या माध्यमातून पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. "आज बोटं मोजताय, उद्या बोटं मोडाल....आणि परवा बोटं तोंडात घालाल, आम्ही "धन"से कमी आहोत पण "मन"से लई आहोत, मौका सबको मिलता है, आदर देतोय, आदर घ्या," असं राजू पाटील यांनी म्हटलं आहे.


शिवसेना ही शरद पवारांच्या प्राणी संग्रहालयातील मांजर बनली आहे. दसरा मेळाव्यातही शरद पवारांचेच विचार मांडले जातील, अशी खोचक टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली होती. मनसेच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना शरद पवार यांनी थेट राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. हाताच्या बोटावर मोजण्याइतपतही ज्यांना आपले लोक विधीमंडळात आणता येत नाहीत त्यांच्याबद्दल काय बोलायचं?", अशा शब्दात शरद पवार यांनी टोला लगावला होता. 


राजू पाटील यांचं ट्वीट
यावर कल्याणमधील मनसे आमदार राजू पाटील यांनी थेट शरद पवार यांना ट्वीटच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, "आज बोटं मोजताय, उद्या बोटं मोडाल....आणि परवा बोटं तोंडात घालाल, आम्ही "धन"से कमी आहोत पण "मन"से लई आहोत, मौका सबको मिलता है, आदर देतोय आदर घ्या."






संदीप देशपांडे काय म्हणाले होते?
शिवसेना ही शरद पवार यांच्या प्राणीसंग्रहालयातील मांजर झाली आहे, हे सगळं आऊटडेटेड नेतृत्व आहे, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला संपवत आहे, त्याबद्दल बघावं. शिवसेनेने राज ठाकरे यांचा धसका घेतला आहे. कितीही म्याव म्याव केलं तरी पिंजऱ्यातल्या मांजराला डरकाळी फोडता येत नाही. बाळासाहेबांचे विचारच नाही तर दसरा मेळावा घेऊन काय फायदा, तुम्ही शरद पवारांचेच विचार देणार आहात, ते कधी पण देता येतात, असं संदीप देशपांडे यांनी चंद्रपुरातील पत्रकार परिषदेत म्हटलं होतं.


मनसेच्या टीकेला शरद पवारांचं एका वाक्यात उत्तर
संदीप देशपांडे यांनी केलेल्या टीकेबद्दल शरद पवार यांना विचारलं असता त्यांनी एका वाक्यात उत्तर दिलं. "ज्या पक्षाला विधिमंडळात हाताच्या बोटावर मोजण्याएवढे आमदारही निवडून आणता येत नाहीत, त्या पक्षाबाबत मी काय बोलणार," अशा शब्दात शरद पवारांनी मनसेवर हल्लाबोल केला. पत्राचाळ घोटाळाप्रकरणात भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी शरद पवार यांचं नाव घेतलं होतं. त्यानंतर पवारांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं. त्यावेळी मनसेच्या टीकेबाबत विचारलं असताना त्यांनी हे उत्तर दिलं.