CM Eknath Shinde Delhi Visit : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा राजधानी दिल्लीतील मुक्काम एका दिवसाने वाढला आहे. एकनाथ शिंदे यांनी काल (21 सप्टेंबर) रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. त्यानंतर आज एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेण्याची शक्यता आहे. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला गेले आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमवीर पंतप्रधान मोदी यांची भेट होणार का, झालीच तर भेटीत काय चर्चा करणार याची उत्सुकता लागली आहे. याशिवाय राज्यातल्या राजकारणावर दिल्लीत खलबतं होणं स्वाभाविक आहे. या गाठीभेटींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी
दिल्लीतला मुक्काम एक दिवसाने वाढवला आहे.


मुख्यमंत्र्यांचा मुक्काम वाढल्याने चर्चांना उधाण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नियोजित दौऱ्यानुसार ते काल रात्रीच मुंबईला येणं अपेक्षित होतं. मात्र त्यांनी स्वतःहून हा मुक्काम एक दिवसाने वाढवला आहे, त्यामुळे चर्चा आणि शक्यतांचा पूर आला आहे. मुख्यमंत्र्यांनी हा मुक्काम अचानक का वाढवला? त्यामागे पंतप्रधान मोदी यांना भेटण्याचं कारण तर नाही ना? जर मुख्यमंत्री अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांना थेट भेटणार असतील त्यांना आता देवेंद्र फडणवीस यांची गरज नाही का? असाही प्रश्न निर्माण होत आहेत. 


एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांची रात्री भेट
दरम्यान, दिल्ली दौऱ्यावर गेलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचं कळतं. मात्र या बैठकीतील तपशील समोर आलेला नाही. आगामी मुंबई महापालिका निवडणुका (BMC Election 2022) आणि वेदांता-फॉक्सकॉन (Vedanta Foxconn) वादाच्या मुद्यांवर ही चर्चा झाली असल्याचा कयास बांधण्यात येत आहे.


इतर राज्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत एकनाथ शिंदेंची बैठक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार राहुल शेवाळे यांच्यासह शिंदे गटातील नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. शिवसेनेतील फुटीनंतर खरी शिवसेना कोणाची याचा वाद आता निवडणूक आयोगासमोर प्रलंबित आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आपला दावा मजबूत करण्यासाठी शिंदे गटाने इतर राज्यातील शिवसेना पदाधिकारी आपल्याकडे ओढण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्यासोबत बुधवारी (21 सप्टेंबर) शिंदे यांनी बैठक घेतली.


संबंधित बातमी