Dasara Melava Row : मुंबईतील शिवाजी पार्कवरील (Shivaji Park) दसरा मेळावा (Dasara Melava) प्रकरणात आता शिंदे गटानेही (Shinde Group) हायकोर्टाचं दार ठोठावलं आहे. शिंदे गटाच्या वतीने हायकोर्टात मध्यस्थ याचिका सादर करण्यात आली आहे. स्थानिक आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी ही याचिका दाखल केली आहे. शिवतीर्थावर दसरा मेळाव्याला परवानगी मिळावी, यासाठी कालच शिवसेनेच्या ठाकरे गटाने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यावर तातडीची सुनावणी करण्याची मागणी शिवसेनेने केली होती. आज शिवसेनेच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. आता शिंदे गटानेही हायकोर्टात मध्यस्थ याचिका दाखल करुन आपल्याच अर्जाला परवानगी देण्याची मागणी केली आहे.
शिंदे गट हीच खरी शिवसेना, आम्हालाच परवानगी मिळावी : सदा सरवणकर
एकनाथ शिंदे गट हीच खरी शिवसेना आहे, असा दावा सदा सरवणकर यांच्या याचिकेत करण्यात आला आहे. ठाकरे गटाला अशाप्रकारची परवानगी मागण्याचा कोणताच अधिकार नाही. आपला अर्ज हा याचिकाकर्त्यांच्या आधी महापालिकेकडे गेला आहे. शिवाय अनिल देसाई यांनी शिवसेनेतर्फे ही परवानगी मागितली आहे. परंतु त्यांना शिवसेनेकडून कोणतंही पद दिलेलं नाही. त्यामुळे त्यांना शिवसेनेसाठी परवानगी मागण्याचा कुठलाही अधिकार नाही. त्यामुळे शिंदे गट ही खरी शिवसेना असून दसरा मेळाव्यासाठी कोणाला परवानगी द्यायची असेल तर ती शिवसेनेला म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्यात यावी, अशा आशयाची मागणी करणारी सदा सरवणकर यांची याचिका आहे.
मुंबई महापालिकेने दोन्ही गटांना परवानगी नाकारली, आता फैसला हायकोर्टात
हायकोर्टात शिवसेनेच्या मुख्य याचिकेवर आज ज्यावेळी सुनावणी होईल तेव्हाच शिंदे गटाच्या याचिकेवर सुनावणी होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे आता हायकोर्ट काय निर्णय देतं याकडे लक्ष लागलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेने शिवसेनेच्या दोन्ही गटांना शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी परवानगी नाकारली आहे. मुंबई महानगरपालिकेने दोन्ही गटांना पाठवलेलं पत्र एबीपी माझाच्या हाती लागलं आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने परवानगी नाकारल्यानंतर आता शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याचा फैसला हायकोर्टात होणार आहे.
संबंधित बातम्या