Raj Thackeray Uddhav Thackeray: त्रिभाषा सूत्रावरुन मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) तब्बल 20 वर्षांनी एकत्र झाले. ठाकरे बंधूंचा मेळावा 5 जुलै रोजी मुंबईतील एनएससीआय डोममध्ये साजरा करण्यात आला. एकत्र राहण्यासाठी एकत्र आलो आहोत, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी या मेळाव्यात भूमिका मांडली. मात्र राज ठाकरेंनी तेवढा युतीबाबत स्पष्टपणा बोलण्यातून दाखवला नाही. त्यातच आता राज ठाकरेंनी युती संदर्भात कोणीही बोलू नये, अशा सूचना दिल्या आहेत. 


शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या युती संदर्भात कोणीही बोलू नये, असे आदेश राज ठाकरे यांनी त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना दिलेत. कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी युती संदर्भात बोलताना आधी मला विचारायचे, असे आदेश राज ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना दिलेत. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि मनसे या दोन पक्षांच्या युती संदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे.


मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीची रंगलेली चर्चा-


वरळी NSCI डोममध्ये झालेल्या संयुक्त मराठी जल्लोष मेळाव्यात ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या युतीच्या चर्चा जोर पकडू लागल्या आहेत. अशातच राज ठाकरे यांनी युती संदर्भात आपल्या पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशांमुळे नवा संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, राज ठाकरे यांना सोबत घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांची तीव्र इच्छा असल्याचे संकेत त्यांच्या विजय मेळाव्यातील भाषणातून तीन-चार वेळा स्पष्टपणे जाणवले. मात्र, राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबतच्या युती संदर्भात सावध भूमिका घेतली आणि त्यावर फार काही भाष्य टाळल्याचे दिसून आले होते. 


राज ठाकरे यांची भूमिका निर्णायक ठरणार


राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात, मराठी माणसांची एकजूट व्हावी आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण व्हावे, असे भावनिक आवाहन केले, पण भविष्यात युती कायम राहील, याबाबत कोणताही स्पष्ट संकेत दिला नाही. त्यामुळे युतीसाठी उद्धव ठाकरे यांनी हात पुढे केले असले तरी राज ठाकरे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. आता मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे वीस वर्षांनी एकत्र आले असले तरी मनसे आणि ठाकरे गटाची युती होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  




संबंधित बातमी:


Pratap Sarnaik Letter To Eknath Shinde: राज ठाकरे बडव्यांना शरण गेले...; प्रताप सरनाईक यांचं एकनाथ शिंदेंना भावनिक पत्र, मनातलं सगळं बोलले!


Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally: उद्धव ठाकरेंचं ते एक वाक्य अन् राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे खळखळून हसल्या