मुंबई: दिल्लीत अमित शाहांच्या भेटीनंतर मी शिंदेंच्या शिवसेनेचा अध्यक्ष होणार अशा चर्चा सुरू झाल्या, पण मी कोणत्याही शिवसेनेचा अध्यक्ष होणार नाही, मी मनसेचाच अध्यक्ष होणार असं राज ठाकरेंनी (Raj Thackeray Shivaji Park Speech) स्पष्ट केलं. तसेच मी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढणार अशा बातम्या येत होत्या, पण चिन्हावर कोणतंही कॉम्प्रमाईज होणार नाही असं ठणकावून सांगितलं. हे इंजिन चिन्ह कष्ठाने कमावलेलं आहे, त्यावरच लढणार असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं. तसेच राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा जाहीर केला असून कार्यकर्त्यांना विधानसभेची तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 


काय म्हणाले राज ठाकरे? 


जसे तुम्ही ऐकत होता, तसेच मीही ऐकत होतो. अमित शाहांच्या भेटीनंतर जे काही चक्र सुरू झालं त्यानंतर अनेक वाटेल त्या चर्चा सुरू झाल्या. अमित शाहांना भेटायला गेलो त्यावेळी आम्ही दोघेच होतो. पण माध्यमांना कसं समजलं काय झालं? त्यावर काहीही चर्चा सुरू झाल्या. 


राज ठाकरे हे शिदेंच्या शिवसेचे प्रमुख होणार अशा चर्चा सुरू झाल्या. पण मला जर व्हायचं होतं तर त्याचवेळी मी शिवसेनाप्रमुख झालो नसतो का? त्यावेळी जवळपास 32 आमदार आणि इतर नेते माझ्यासोबत होते. मी त्यांना पहिल्यांदाच सांगितलं होतं की मला शिवसेना फोडून कुठलीही गोष्ट करायची नाही. बाळासाहेब ठाकरे यांना सोडून मी कुणाच्या हाताखाली काम करणार नाही, स्वतःचा पक्ष काढणार असं ठरलं होतं. 


काँग्रेसवाल्यांसोबत भेटी होत्या पण गाठी पडल्या त्या भाजपसोबत


माझा जन्म हा शिवसेनेत झाला, त्यामुळे बाळासाहेब असताना शिवसेचेचे संस्कार होते. त्यानंतर भाजपच्या नेत्यांसोबत जवळीकता आली. शिवसेना आणि भाजप एकत्र असताना भाजप नेत्यांशी चर्चा झाल्या. त्यामध्ये नितीन गडकरी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या नेत्यांसोबत जवळीकता वाढली. त्या काळात काँग्रेसच्या नेत्यांसोबतही भेटी व्हायच्या, पण गाठी पडल्या त्या भाजपसोबतच. 


माझं प्रेम आणि रागही टोकाचा


मला 2014 च्या आधी नरेंद्र मोदींची भूमिका पटत होती. त्यावेळी मी त्यांना समर्थन दिलं. पण नंतर त्यांच्याबद्दल असलेल्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे त्यांना टोकाचा विरोध केला. पण माझा विरोध हा मला मुख्यमंत्रिपद मिळालं नाही म्हणून नव्हता, भूमिका पटली नव्हती म्हणून होता. या पुढेही जे काही चांगलं ते चांगलंच म्हणणार आणि जे काही वाईट असेल त्याला विरोधच करणार असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं. 


सध्या भारत हा तरूणांची सर्वात मोठी संख्या असणारा देश आहे. पण पुढच्या दहा वर्षात हे चित्र बदलणार आहे. या देशात कराचा सर्वाधिक वाटा हा महाराष्ट्रातून जातोय, त्यामुळे केंद्राकडून येणारा मोठा वाटा हा महाराष्ट्रालाच मिळायला हवा अशी अपेक्षा नरेंद्र मोदींकडून आहे. 


महाराष्ट्रात चुकीच्या पद्धतीने कॅरम फोडला


महाराष्ट्रात कॅरम चुकीच्या पद्धतीने फोडला गेला, त्यामुळे कुणाच्या सोंगट्या कुठे गेल्यात हेच समजत नाही. राज्यातल्या राजकारणातील सर्वात वाईट परिस्थिती आहे. त्यामुळे राज्यातल्या मतदारांनी व्याभिचाराला राजमान्यता देऊ नये. नाहीतर पुढचे दिवस हे भीषण असतील. 


मला वाटाघाटीमध्ये पडायचं नाही, त्यामुळे राज्यसभा किंवा विधानपरिषद नको असं सांगितलं. मी नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा देणार असं आज जाहीर करतोय.


निवडणुकीच्या कामात डॉक्टर्सनी जावू नयेत


जवळपास पाच वर्षानंतर महाराष्ट्रात निवडणुका होत आहेत. महापालिकेच्या निवडणुका आता होतील असं म्हणता म्हणता अजूनही होत नाहीत. त्यामुळे 2019 नंतर आता पहिल्यांदाच निवडणुका होतायंत. आचारसंहिंतेच्या नावाखाली महापालिकेच्या रुग्णालयाचे डॉक्टर्स आणि नर्सेस यांची नियुक्ती केली जात आहेत. निवडणुका होणार आहेत हे माहिती असूनही निवडणूक आयोग एक व्यवस्था का निर्माण करत नाहीत? ज्या डॉक्टर्स आणि नर्सेसवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे त्यांनी त्या ठिकाणी जावू नयेत. त्यांना कोण कामावरून काढतंय ते पाहतोच. 


राज ठाकरेंच्या भाषणाकडे सर्वाचं लक्ष


लोकसभा निवडणुकीची संपूर्ण राज्यात रणधुमाळी पेटली असून महाविकास आघाडी आणि महायुती एकमेकांविरोधात शड्डू ठोकून सज्ज झालेत. जागांचे फॉर्म्युले, उमेदवाऱ्यांची घोषणा यांनी निवडणुकांचा चांगलाच माहौल तयार झाला आहे. मात्र या सगळ्यात राज ठाकरे आणि त्यांची मनसे काय भूमिका घेणार याची उत्सुकता संपूर्ण राज्याला लागली होती. 


आज मनसेचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित गुढीपाडवा मेळावा पार पडला. आजच्या मेळाव्यात आपली भूमिका जाहीर करू असं राज ठाकरेंनी याआधीच स्पष्ट केलं होतं. त्यामुळे शिवाजी पार्कवर होणाऱ्या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे डोळे आणि कान लागले होते. 


राज ठाकरेंची मधल्या काळातली महायुतीशी वाढलेली जवळीक, महायुतीच्या नेत्यांनी शिवतीर्थ या निवासस्थानी लावलेली हजेरी आणि त्यांची दिल्लीवारी यामुळे राज ठाकरे हे महायुतीत सहभागी होणार का याची उत्सुकता होती. 


ही बातमी वाचा: