Raj Thackeray Speech : "पक्षातील अंतर्गत वाद सोशल मीडियावर कमेंट करुन काढला तर त्याला क्षणभरही पक्षात ठेवणार नाही," अशी ताकीद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिली आहे. मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिर इथे आज मनसे (MNS) पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात संबोधताना राज ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य करत पक्षातील वाद सोशल मीडियावर (Social Media) मांडू नये असा इशारा दिला.
'आतापर्यंत खूप चोचले पुरवले, झालं तेवढं खूप झालं'
राज ठाकरे म्हणाले की, "मी तुम्हाला आताच सांगून ठेवतो. जर समजा पक्षातल्या पक्षात, अंतर्गत, एकमेकांविषयी कोणीही फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर कोणत्याही प्रकारच्या कमेंट केल्यास त्याला एक क्षणभरही पक्षात ठेवणार नाही. तुमचे चोचले मी खूप पुरवले मी आतापर्यंत. झालं ते तेवढं खूप झालं. तुम्हाला तुमचं काम सांगायचं असेल तर त्या माध्यमाचा उपयोग करा. पण तुम्हाला एकमेकांची उणीदुणी काढायची असेल त्या माध्यमावर काढून तर बघा. जर असं कोणी काढलं असेल तर ते माझ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. संदीप देशपांडे, सचिन मोरे किंवा इतर पक्षातील नेत्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे, माझ्यापर्यंत ती गोष्ट आली पाहिजे."
'इतर पक्षांसारखा धुडगूस मी आपल्या पक्षात चालू देणार नाही'
पदाधिकाऱ्यांना संबोधताना राज ठाकरे म्हणाले की, "तुम्ही प्रमुख पदांवर असाल तर त्या पदाची शान राखली पाहिजे. पक्षाने ज्या पदावर तुमची नेमणूक केली आहे, त्याचा आदर केला पाहिजे. तुमच्याबरोबरच्या सहकाऱ्यांना काहीतरी सांगितलं पाहिजे. तुम्ही पण त्यांच्यातले होऊन वाद घालत बसणार असाल तर कसं होणार सांगा मला. बाकीच्या राजकीय पक्षांमध्ये होणारा धुडगूस चालू असेल तो चालू दे. मी आपल्या पक्षामध्ये हे चालू देणार नाही. मघाशी बाळा नांदगावकरांनी भाषणामध्ये विषय काढला सोशल मीडियाचा. मी तुम्हाला आताच सांगून ठेवतो. जर समजा पक्षातल्या पक्षात, अंतर्गत, एकमेकांविषयी कोणीही फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर कोणत्याही प्रकारच्या कमेंट केल्यास त्याला एक क्षणभरही पक्षात ठेवणार नाही."
Raj Thackeray : पक्षातील अंतर्गत वाद सोशल मीडियावर कमेंट करुन काढला तर क्षणभरही पक्षात ठेवणार नाही
संबंधित बातम्या