Aurangabad News: ग्रामीण भागातील गावांचा विकास होण्याच्या उद्देशाने केंद्राकडून राबवली जाणारी आदर्श ग्रामविकास योजनावरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्राची आदर्श ग्रामविकास योजना फालतू आणि उगाच टाईमपास असल्याचं जलील म्हणाले आहे. औरंगाबादमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना जलील यांनी ही टीका केली आहे.
यावेळी बोलतांना जलील म्हणाले की, पंतप्रधान आदर्श ग्रामविकास योजना म्हणजे बकवास, फालतू योजना आहे. खासदारांना सांगितले गेले की दर वर्षी पाच गावांना दत्तक घ्यावे. दत्तक घेऊन काय करायचे तर खासदार निधीतून गावाचा विकास करायचा. त्यामुळे जर खासदारांच्या निधीतूनच विकास करायचा असेल तर खुद्द खासदार करेल ना, त्यापुढे पंतप्रधान यांचे नाव लावण्याची काय गरज आहे. त्यामुळे ही खासदार दत्तक योजना होऊ शकते.
यासाठी कोणतेही मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आल्या नाही. जेव्हा आम्ही विचारण्यासाठी गेलो तर खासदार निधीतून पैसे खर्च करण्याचे आम्हाला सांगितले गेले. आता आधीच आमच्या दोन वर्षांचा निधी सरकराने संपवून टाकला आहे, मग आम्ही गावात जाऊन काय करायचे. त्यामुळे ही बकवास योजना असून, त्यात अनेक बदल करण्याची गरज असल्याचं जलील म्हणाले.
घाटी रुग्णालयाच्या दुरावस्था
औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातील दुरावस्थेचा मुद्दा उपस्थित करत जलील यांनी गंभीर आरोप केले आहे. घाटीतील डॉक्टर, परिचारिका भरती गेल्या कित्येक वर्षांपासून रखडली आहे. त्यामुळे संपूर्ण मराठवाड्यातून या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांचे प्रचंड हाल होत असल्याचा आरोप जलील यांनी केला आहे. तर घाटीत असलेले काही डॉक्टर मुंबईत बसून औरंगाबादच्या घाटीतील पगार उचलत असल्याचा आरोप जलील यांनी केला आहे. तसेच घाटीतील वार्डांची दयनीय अवस्था झाली असून, रुग्णांवर जमिनीवर झोपून उपचार घेण्याची वेळ आली असल्याचं जलील म्हणाले. त्यामुळे या सर्वांच्या विरोधात आपण न्यायालयात याचिका दाखल केली असल्याची माहिती जलील यांनी दिली आहे.
मेडिकल चालकांशी डॉक्टरांचे लागेबांधे
यावेळी बोलतांना जलील यांनी घाटीला होणाऱ्या औषध पुरवठ्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. घाटी परिसरात एकूण 26 मेडिकल आहेत. जर सरकारकडून घाटीत औषध पुरवठा केला जात असेल तर एवढ्या मोठ्याप्रमाणावर मेडिकलची गरज का? आणि तिथे जाण्याची रुग्णांवर वेळ कशामुळे येत आहे. या मेडिकलशी घाटीतील डॉक्टरांचे लागेबांधे असू शकते, असा प्रश्नही जलील यांनी याचिकेत उपस्थित केलेला आहे.