Raj Thackeray: नागपूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठवाडा आणि विदर्भ दौरा करत मनसेच्या काही उमेदवारांची घोषणा देखील केली. यापूर्वी मनसेच्या 7 उमेदवाराची घोषणा करण्यात आली असून वरळी मतदारसंघातून मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांचेही नाव चर्चेत आहे. विशेष म्हणजे याच आठवड्यात राज ठाकरेंच्या प्रमुख उपस्थितीत तेथे व्हिजन वरळी हा कार्यक्रम देखील घेण्यात आला. त्यावेळी, राज ठाकरेंनी (Raj Thackeray) त्यांच्या उमेदवारीचे संकेतही दिले. मात्र, उमेदवारी घोषित करण्यात आली नाही. आता विदर्भ दौऱ्यातील दुसऱ्या टप्प्यातही राज ठाकरेंनी उमेदवारांची चाचपणी केली असून नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याविरोधात मनसेचा उमेदवार निश्चित केला आहे.
विदर्भ दौऱ्यावर असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं असून मनसेचे 7 उमेदवार जाहीर केले होते. मराठवाडा दौऱ्यानंतर काही दिवस विश्रांती घेत राज ठाकरेंनी विदर्भ दौऱ्याला गोंदिया, भंडाऱ्यातून सुरुवात केली. त्यावेळी, अपेक्षानुसार राज ठाकरेंनी चंद्रपुरातून मनसेच्या दोन उमेदवारांच्या नावांची गुरुवारी रात्री घोषणा केली होती. त्यानंतर, वणी मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे, विदर्भ दौऱ्यात राज ठाकरेंनी तीन उमेदवार घोषित केले असून तत्पूर्वी 4 उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे, मनसेचे आत्तापर्यंत एकूण 7 उमेदवार जाहीर झाले आहेत.
राज ठाकरे यांचा अमरावती विभाग दौरा आज आटोपला असून नागपूरमधील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर राज ठाकरे मुंबई रवाना झाले आहेत. येथील बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मनसेनं उमेदवार देणार असल्याचे निश्चित केलं आहे. राज ठाकरे यांचा निर्णय ठरला असून त्यांचे मित्र असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मनसेनं उमेदवार निश्चित केला आहे. नागपूर येथील मनसे नेते तुषार गिरे यांना उमेदवारी जाहीर होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे, जवळचे मित्र असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध राज ठाकरेंचा मनसे उमेदवार निश्चित मानला जात आहे. राज ठाकरेंनी आज नागपूर विभागाचा आणि नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यांचा आढावा घेतला. त्यावेळी, विधानसभा निवडणुकांसाठी राज ठाकरेंनी उमेदवारांची चाचपणी केली. अमरावती आणि नागपूर विभागातील 11 जिल्ह्याचा दौरा दोन दिवसांत पूर्ण करुन ते मुंबईकडे रवाना झाले आहेत.
नागपूरमधून तुषार गिरेंना उमेदवारी?
लोकसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा देणारे राज ठाकरे विधानसभेत मात्र वेगळे लढत असल्याने भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. विदर्भात राज ठाकरे यांच्या आदेशान्वये मनसे विधानसभेच्या निवडणुकीत उतरत असून मनसेच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मनसैनिक प्रयत्नशील आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज राज ठाकरेंचा दोन दिवसीय अमरावती विभाग दौरा झाला असून मनसेचे विदर्भ प्रमुख राजू उंबरकर यांनी याबाबत माहिती दिली. तसेच, नागपूरमध्ये नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून तुषार गिरे यांना उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. नवरात्री उत्सवात मनसेकडून पुढील उमेदवारांची घोषणा होणार आहे. त्यामध्ये, तुषार गिरे यांच्याही नावाची घोषणा होईल,असे समजते. दरम्यान, तुषार गिरे हे भाजप महायुतीमधील नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देतील.
राज ठाकरेंनी घोषित केलेले मनसेचे 7 उमेदवार
1. बाळा नांदगावकर - शिवडी, मुंबई
2. दिलीप धोत्रे - पंढरपूर
3. लातूर ग्रामीण - संतोष नागरगोजे
4. हिंगोली विधानसभा - बंडू कुटे
5. चंद्रपूर - मनदीप रोडे
6. राजुरा - सचिन भोयर
7. वणी - राजू उंबरकर
हेही वाचा
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?