Raj Thackeray MNS : काही दिवसांपूर्वी मराठीच्या अस्मितेसाठी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. दोघेही ठाकरे बंधू तब्बल 20 वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर दिसून आले. यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. त्यातच आता मनसे प्रमुख राज ठाकरे हे अ‍ॅक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहे. मनसेकडून (MNS) उद्यापासून तीन दिवस राज्यस्तरीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे तीन दिवसीय राज्यस्तरीय शिबिराचे आयोजन केलं आहे. हे शिबिर उद्यापासून ( दि. 14 जुलै) सुरू होणार असून 16 जुलैपर्यंत चालणार आहे. या शिबिरात संपूर्ण राज्यभरातून मनसेचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः या शिबिरात मार्गदर्शन करणार असून आगामी निवडणुकांसाठी पक्षाची रणनीती, दिशा आणि कार्यपद्धती यावर सखोल चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.  

निवडणुकांसाठी मोर्चेबांधणीची सुरुवात

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना मनसेने या शिबिराच्या माध्यमातून आपली मोर्चेबांधणी अधिक तीव्र करण्याचा निर्धार केलाय. मनसेने अलीकडेच हिंदी सक्तीविरोधात उचललेल्या पावलांना समाजातून आणि विविध स्तरांतून पाठिंबा मिळाल्याने पक्षाच्या मनोबलात मोठी वाढ झाली आहे. हे यश पक्षासाठी ‘बूस्टर डोस’ मानलं जात असून मनसेकडून आता निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी केली जात आहे.  

राज्य शिबिरासाठी मनसेकडून नाशिकची निवड 

नाशिक हा मनसेचा एकेकाळचा बालेकिल्ला मानला जात होता. नाशिकमध्ये याआधी देखील मनसेचे राजस्तरीय शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा मनसेच्या राज्यशिबिरासाठी नाशिकची निवड केल्याने चर्चांना उधाण आले आहे. नाशिकच्या इगतपुरीत होणाऱ्या शिबिरात आगामी निवडणुकीची मनसेची रणनीती ठरणार आहेत. तर गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करायची की नाही? याबाबत मनसेच्या शिबिरात राज ठाकरे काही भूमिका मांडणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आणखी वाचा

Raj Thackeray-Uddhav Thackeray: आता संभ्रम नको, दोन ठाकरेंची युती होणे गरजेचे; सामनाच्या रोखठोकमधून भाष्य, राज ठाकरे निर्णय घेणार?