मुंबई: महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेत आता शरद पवार (Sharad Pawar) विरुद्ध अजित पवार (Ajit Pawar) असा सामना पाहायला मिळणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण आता मला कबड्डीमध्ये पुन्हा लक्ष घालावे लागेल, असा सूचक इशारा शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिला आहे. ज्येष्ठ क्रीडा पत्रकार विनायक दळवी लिखित कबड्डीतील किमयागार या संदर्भ ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. राज्य कबड्डी संघटनेत काही लोकांनी चुकीचा मार्ग अवलंबला आहे. ते संस्था आपल्या मुठीत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप शरद पवारांनी शनिवारी यशवंतराव चव्हाण सेंटरमधल्या सोहळ्यात बोलताना केला. राज्य कबड्डी असोसिएशनची सूत्र सध्या अध्यक्ष असलेल्या अजित पवारांच्या (Ajit Pawar) हाती आहेत.
आता मला कबड्डीत लक्ष घालावं लागेल, शरद पवार काय म्हणाले?
राज्य कबड्डी संघटनेत काही लोकांनी चुकीचा मार्ग अवलंबला आहे. ते संस्था आपल्या मुठीत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. या खेळात लागणारं कसब आहे त्यामध्ये आक्रमण होतंय का काय असं मी म्हणेन. आता एंकदरीत स्थिती ऐकल्यानंतर त्याच्यात लक्ष घालण्याची परिस्थिती आली आहे, असंही शरद पवारांनी बोलताना म्हटलं आहे.
महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्षपदी आहेत. शरद पवार यांनी 28 वर्षे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्षपद सांभाळले होते. आता हे पद अजित पवारांकडे आहे, त्यामुळे शरद पवार यांच्या बोलण्याचा रोख नेमका कोणाकडे होता अशी चर्चा रंगली आहे.