Anil Deshmukh On Devendra Fadnavis नागपूर :  न्यायमुर्ती चांदीवाल चौकशी अहवाल हा महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) कार्यकाळात आला होता. उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavi) यांनी केलेला दावा हा खरा आहे. मात्र, काही दिवसातच आमचं सरकार कोसळले. त्याला जबाबदार देखील त्यांचाच पक्ष होता. त्यामुळे चांदीवाल चौकशी अहवाल आमचं सरकार जाहीर करू शकलं नाही. त्यानंतर गेले दोन वर्ष हाच चांदीवाल आयोगाचा अहवाल त्यांच्या सरकारकडे पडून होता. 11 महिने चौकशी आणि चौदाशे पानांचा रिपोर्ट महायुती सरकारनं जाहीर करावा, अशी माझी मागणी होती. त्यासाठी अनेकदा मी त्या आशयाचे पत्र देखील पाठवले.


माझ्या विरोधातल्या आरोपाबद्दल चौकशी अहवालमध्ये नेमकं काय आढळलं, हे त्यांनी जाहीर करावं, अशी मागणी मी लावून धरली होती. मात्र त्यावेळी या सर्व प्रकरण दडवून ठेवण्याच काम या सरकारने केलं असून हे या आरोपांमध्ये कुठलेही तथ्य नसल्याचा पुनरुच्चार करत माजी गृहमंत्री  अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. मविआच्या (Maha Vikas Aghadi) कार्यकाळात चांदीवाल अहवाल आला असताना कारवाई का केली नाही? या देवेंद्र फडणवीसांचा प्रश्नाला उत्तर देत अनिल देशमुखांनी आज पुन्हा जोरदार पलटवार केला आहे. ते नागपूर येथे बोलत होते. 


देवेंद्र फडणवीस आणि परमबीर सिंह यांच्यात डील झाली होती- अनिल देशमुख


मी गृहमंत्री असताना मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्कॉर्पिओ गाडीत बॉम्ब ठेवण्यात आला होता. त्यानंतर गाडी मालकाची हत्या झाली. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये परमबीर  सिंह जे तेव्हाचे मुंबई पोलिसांचे आयुक्त होते, तेच या प्रकरणाचे मास्टरमाईंड होते. त्यांना NIA मार्फत अटक होणार होती. त्यावेळेस फडणवीस आणि परमबीर  सिंह यांच्यात बोलणं झालं आणि तेव्हा परमबीर सिंह फडणवीस यांना शरण गेले. तेव्हा फडणवीसांनी परमबीर सिंह यांना मदत करण्याचे आश्वासन दिले आणि त्यांना माझ्यावर आरोप करायला लावले. परिणामी, फडणवीस आणि परमबीर सिंह यांच्यात डील झाली होती आणि त्यानुसारच परमबीर सिंह यांनी माझ्यावर आरोप लावले. असा गंभीर आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केला आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या