मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात नवी समीकरणे तयार होताना दिसत आहेत. कारण एकीकडे राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरु असताना, राज आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीने राजकारणाची दिशाच बदलली आहे. आधी राज-उद्धव, मग राज आणि एकनाथ शिंदे अशी युतीची चर्चा होती. मात्र आजच्या भेटीनंतर राज ठाकरे हे भाजपसोबत युतीसाठी अनुकूल असल्याची चर्चा आहे. 

Continues below advertisement

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांनी मनसेच्या नेत्यांची बैठक बोलावली. राज ठाकरेंचं निवासस्थान शिवतीर्थवर मुंबई, ठाणे आणि पालघरच्या शहरप्रमुख आणि उप शहरप्रमुखांना निमंत्रण आहे. या भेटीसाठी अनेक नेते दाखलही झाले आहेत.  

सध्या राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांना कोणतंही भाष्य न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्या ग्राऊंडवर नेमकं वातावरण काय आहे, चर्चा काय होत आहेत, याचा आढावा घेतला जात आहे. जर भाजपसोबत युती केली तर काय परिणाम होऊ शकतो, याचीही चर्चा राज ठाकरे मनसे नेत्यांसोबत करत आहेत. 

Continues below advertisement

राज्यभरातील समीकरणासाठी भाजपसोबत अनुकूल? 

राज ठाकरे हे भाजपसोबत जाण्यासाठी अनुकूल का असू शकतात याची काही कारणं सांगितली जात आहेत. त्यातील महत्त्वाचं कारण म्हणजे राज ठाकरे यांची भाजपसोबत युती झाली तर केवळ मुंबईच नव्हे तर ठाणे, नाशिक, पुणे यासह राज्यभरातील महापालिकांमधील समीकरणेही बदलू शकतात. युती केल्याने राज ठाकरे यांना जागा आणि लढण्यासाठी ताकद मिळेल. दीर्घकालीने राजकारणाचा भाग म्हणून राज ठाकरे भाजपसोबत अनुकूल असू शकतात.

त्या तुलनेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती केल्यास, शिवसेनेची सध्याची असलेली ताकद, मुंबई, ठाणे वगळता उर्वरित महापालिकांमधील संख्याबळ याचा फायदा मनसेला होण्याची शक्यता कमी आहे. दुसरीकडे हेच सूत्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती केल्यास लागू होतं. 

भलेही राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षांचं मूळ हे बाळासाहेब ठाकरे असले तरी, उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे यांच्यासोबत युती करुन मर्यादित वाटेकरी राहण्यापेक्षा, राष्ट्रीय पक्ष भाजपसोबत युती करुन मनसेचा विस्तार होण्यासाठी जमेची बाजू ठरु शकते. त्यामुळेच राज ठाकरे हे भाजपसोबत युतीसाठी अनुकूल असू शकतात.

मनसे नेत्यांची बैठक

मनसेच्या नेत्यांची बैठक राज ठाकरे यांच्या निवासस्थानी होत आहे. मनसे नेते संदीप देशपांडे हे शिवतीर्थ येथे दाखल झालेत. त्याआधी संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मंत्री उदय सामंत यांच्या घरी पोहोचले होते. पण एकनाथ शिंदे यांची भेट होऊ शकली नाही. पनवेलमध्ये फुलबाजार सुरु करायचा आहे. त्यासाठी मी उदय सामंत यांची भेट घेतली. यावेळी युतीची चर्चा वगैरे काही झाली नाही, असं दोन्ही नेत्यांनी सांगितलं. 

राज ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेट 

दरम्यान, राज्याच्या राजकारणात आज सर्वात मोठ्या भेटीने लक्ष वेधलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. प्रभागरचना करण्याचे आदेश आल्यानंतर महानगरपालिका निवडणुकांसाठी मोठ्या हालचाली सुरु झाल्या आहेत.  त्या पार्श्वभूमीवर राज-फडणवीस भेटीला विशेष महत्त्व आहे.  वांद्रे येथील ताज लँड्स या पंचतारांकित हॉटेलमध्ये ही भेट झाली. 

संबंधित बातम्या 

Raj Thackeray Meets Devendra Fadnavis: धक्कातंत्र, इशारा, प्रतिमा अन् संदेश...; राज-फडणवीसांच्या भेटीचा अर्थ काय?; 10 मुद्द्यांमधून सगळं समजून घ्या!