नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul gandhi) गेल्या काही दिवसांपासून चांगलेच आक्रमक झाले असून केंद्रातील मोदी सरकार आणि निवडणूक आयोगावर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी झाल्याचे सांगत त्यांनी काही पुरावेही पत्रकार परिषदेतून समोर मांडले. तसेच, गत लोकसभा 2024 च्या निवडणुकीतही बोगस मतदान आणि ईव्हीएम मतदान (Voting) प्रक्रियेत घोळ झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यावेळी, मतदारयादीत काही जिवंत नागरिकांना मृत घोषित केलं असून काही मृत नागरिक जिवंत असल्याचा दावा देखील राहुल गांधींनी केला होता. आता, याच यादीतील बिहारमधील (Bihar) काही नागरिकांना ते भेटले असून, आयुष्यात कधी मृत व्यक्तींसोबत चहा पिण्याची संधी मिळेल, असं वाटलं नव्हतं, असे राहुल गांधींनी म्हटलं आहे.
राहुल गांधींनी पत्रकार परिषदेतून बिहारमधील निवडणुकीतील बोगसगिरी समोर आणली होती. बिहार एसआयआर आणि मतदान चोरीच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी आज निवडणूक आयोगाकडून मृत घोषित करण्यात आलेल्या नागरिक, मतदारांची भेट घेतली. तसेच, त्यांच्यासमवेतच्या भेटीचा व्हिडिओ शेअर करत राहुल गांधींनी मजेशीर शब्दात सत्ताधारी व निवडणूक आयोगाला चिमटा काढला आहे. आयुष्यात अनेक मजेशीर अनुभव घेतले आहेत, मात्र कधीही मृत व्यक्तींसोबत चहा पिण्याची संधी मिळाली नव्हती. या अनोख्या अनुभवासाठी निवडणूक आयोगाचे धन्यवाद, असे मजेशीर ट्विट राहुल गांधींनी केले आहे. तसेच, या मतदारांसमवेत चहा पितानाचा व्हिडिओ देखील त्यांनी शेअर केला आहे. तसेच, एसआयआर दरम्यान तुम्हाला मृत घोषित केलं होतं, हे तुम्हाला कसे समजले? असा सवाल देखील राहुल गांधींनी उपस्थित केला आहे. यावेळी आरजेडी नेता संजय यादव हेही उपस्थित होते.
राघोपूर मतदारसंघातील नागरिक
संजय यादव यांनी संबंधित व्यक्तींची माहिती देत, हे सर्व नागरिक तेजस्वी यादव यांच्या राघोपूर विधानसभा मतदारसंघातील असल्याचे सांगितले. तसेच, एक वृद्ध महिला आपलं मतदान वाचविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात तब्बल 6 तास वाट पाहात उभी होती. आमच्याकडे अधिकृत यादी आहे, ज्यामध्ये हे सर्व नागरिक मृत घोषित करण्यात आले आहेत. त्यामुळेच, आमची मागणी आहे की, बिहारमधील 65 लाख मतदारांचे नाव कमी होण्यामागचं कारण काय? या प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळावं, असे संजय यादव यांनी म्हटले.