National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सोमवारी ईडीने सुमारे 9 तास चौकशी केली. ईडीने त्यांना चौकशीसाठी पुन्हा मंगळवारी हजर राहण्यास सांगितले आहे. आजच्या चौकशीत बँक खात्यासह अनेक बाबींवर चौकशी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आज ईडीने राहुल गांधींची दिवसातून दोनदा चौकशी केली. राहुल गांधी सकाळी 11.10 वाजता दिल्ली येथील एपीजे अब्दुल कलाम रोड येथील ईडीच्या मुख्यालयात पोहोचले. त्यानंतर ते दुपारी अडीच वाजता ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडले.
एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, काँग्रेस खासदार राहुल गांधी दुपारच्या जेवणासाठी ईडी कार्यालयातून बाहेर पडले आहेत, ते पुन्हा चौकशीसाठी येतील. यानंतर पुढील चौकशीसाठी राहुल गांधी पुन्हा चार वाजण्याच्या सुमारास ईडी कार्यालयात पोहोचले. त्याचवेळी रात्री दहाच्या सुमारास राहुल गांधी ईडीच्या मुख्यालयातून बाहेर पडले.
याच दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिवसभर रस्त्यावर निषेध मोर्चा काढून ईडी आणि भाजपच्या विरोधात निदर्शने केली. यानंतर काँग्रेसचे बडे नेते आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. नॅशनल हेराल्डमध्ये कोणताही घोटाळा झाला नसल्याचे काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले. नॅशनल हेराल्ड कंपनीने यंग इंडिया कंपनीची थकबाकी माफ करून कर्मचाऱ्यांचे वेतन अदा केले आहे. आम्ही भाजप सरकारप्रमाणे भारतातील सरकारी मालमत्ता विकल्या नाहीत, असं काँग्रेस नेते म्हणाले आहेत.
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी केंद्रावर साधला निशाणा
राहुल गांधी यांची ईडी चौकशी सुरू असताना काँग्रेस नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले की, आज आमचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने समन्स बजावले आहे. याविरोधात आमच्या हजारो कार्यकर्त्यांनी देशभरात निदर्शने केली. भाजप सरकारने गेल्या 8 वर्षांपासून विरोधी पक्षांच्या नेत्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. भाजप किंवा त्यांच्या मित्रपक्षांवर एकही गुन्हा दाखल झालेला नाही. एजन्सीचा गैरवापर होत आहे. विरोधी पक्षाचा नेता भाजपमध्ये गेल्यावर त्याच्यावरील जुने आरोपही संपतात. लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. याला आमचा विरोध आहे.
राहुल आणि सोनिया गांधी यांना समन्स बजावण्यात आले
दरम्यान ईडीने यापूर्वी राहुल गांधींना 2 जूनला हजर राहण्यास सांगितले होते. मात्र आपण देशाबाहेर असल्याचे सांगत त्यांनी दुसरी एखादी तारीख देण्यात यावरी अशी विनंती केली होती. याप्रकरणी ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना 23 जून रोजी समन्स बजावले आहे. यापूर्वी त्यांना 8 जून रोजी हजर राहण्याची नोटीस देण्यात आली होती. पण सोनिया गांधी यांनी हजर राहण्यासाठी आणखी वेळ मागितला होता, कारण त्यांना कोरोनाची लागण झाली असून त्या अद्याप बऱ्या झाल्या नाहीत.