अमरावती : महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांसाठी बड्या नेत्यांच्या प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. विदर्भातील अमरावती मतदारसंघात आज गृहमंत्री अमित शाह यांची महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यासाठी सभा होत असून काँग्रेस नेते राहुल गांधींचीही (Rahul Gandhi) अमरावतीमधील परतवाडा येथे सभा होत आहे. त्यानंतर, काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे, माढ्यातील पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ मरिआई चौकातील एक्झिबिशन ग्राउंडवर राहुल गांधींची सभा होणार आहे. तत्पूर्वी, परतवाड्यातील सभेत बोलताना राहुल गांधींनी मोदी सरकावर निशाणा साधला. मोदी सरकारने देशातील ठराविक उद्योगपतींच १६ लाख कोटीचं कर्ज माफ केलं आहे. मात्र, गरीब शेतकऱ्यांचं (Farmers) कर्ज माफ केलं नाही, असे म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. तसेच, आपल्या सभेतून महिला, युवक आणि शेतकऱ्यांसाठी राहुल गांधींनी महत्त्वाच्या घोषणाही केल्या. 


काँग्रेस पक्षाचं सरकार आल्यास देशातील कोट्यवधींना लखपती बनविण्यात येणार आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात उल्लेख केल्याप्रमाणे सर्वात अगोदर महालक्ष्मी योजना लागू करण्यात येईल. त्यानुसार, देशातील गरीब कुटुंबांची यादी बनवली जाईल. प्रत्येक गरीब कुटुंबातील एका महिलेचं नाव निवडलं जाईल. त्या महिलेच्या बँक खात्यात इंडिया आघाडीचं सरकार वर्षाला 1 लाख रुपये टाकणार आहे. तर, महिन्याला 8 हजार 500 रुपये देशातील कोट्यवधी महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये टाकले जाती, अशी घोषणा राहुल गांधींनी अमरावतीमधील सभेतून केली. तुम्ही २५ अब्जाधीश बनवा, आम्ही कोट्यवधी लक्षाधीश बनवणार असे म्हणत मोदी सरकावर निशाणा साधला. 


अंगणवाडी महिलांची पगार दुप्पट


अंगणवाडीच्या महिलांना दुप्पट पगार दिला जाईल, अशी घोषणाही राहुल गांधींनी केली. तसेच, भारत सरकार आणि सार्वजनिक श्रेत्रात महिलांना टक्के आरक्षण दिले जाईल, असेही गांधींनी म्हटले. 


युवकांसाठी 1 लाख रुपये


नरेंद्र मोदींनी देशातील युवकांना 2 कोटी नोकरीचं अमिष दाखवलं. मात्र, गेल्या 45 वर्षातील सर्वात मोठी बेरोजगारी भारतात आहेत. त्यामुळे, गरिबांची लेकरं नोकरीच्या शोधात भटकत आहेत. जी सुविधा देशातील श्रीमंत लोक त्यांच्या मुलांना देतात, तीच सुविधा आम्ही गरिबांच्या लेकरांना, देशातील युवकांना देणार आहोत. देशातील सर्वच पदवीधरांना आम्ही अप्रेंटीशीप देणार आहोत, अशी घोषणाही राहुल गांधींनी सोलापुरातील सभेतून केली. त्यानुसार, 1 वर्षाची नोकरी गरंटी स्वरुपात दिली जाणार आहे. खासगी, सरकारी, सार्वजनिक क्षेत्रात ही नोकरी दिली जाणार असून बँक खात्यात या नोकरीच्या माध्यमातून वर्षासाठी 1 लाख रुपयेही दिले जाणार असल्याचेही घोषणा राहुल गांधींनी केली. त्यांनी 20-25 अब्जाधीश बनवले आहेत, तर आम्ही कोट्यवदी लखपती घडवणार आहोत, असेही राहुल गांधींनी यावेळी म्हटले.  


शेतकऱ्यांसाठीही घोषणा


महिलांसाठी घोषणा केली, बेरोजगारांसाठी घोषणा केली, आता माझ्या प्रिय शेतकऱ्यांना महिलांना मिळणारे 1 लाख रुपये तुमच्याही घरात येतील. नरेंद्र मोदींनी 10 वर्षात तुमचं कर्ज माफ केलं नाही. मात्र, आम्ही सरकारमध्ये येताच शेतकऱ्यांची कर्ज माफी करणार असल्याची घोषणाही राहुल गांधींनी सभेतून केली. आम्ही शेतकऱ्यांचा आयोग बनवणार असून, देशातील शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी हा आयोग सरकारला माहिती देईल. त्यातून, एकदाच नाही, अनेकदा कर्जमाफी केली जाईल, असेही राहुल गांधींनी म्हटले. जर, अब्जाधीशांचे कर्ज माफ होऊ शकत असेल, तर शेतकऱ्यांचंही कर्ज माफ झालं पाहिजे, असेही राहुल गांधींनी म्हटले. 


जातनिहाय जनगणना करणार


मी आज तुमचा मूड बनवायला आलोय, तुम्हाला खुश करायला आलोय. देशात 15 टक्के दलित आहेत, 8 टक्के आदिवासी आहेत, 50 टक्के ओबीसी आहेत. त्यामध्ये, 17 टक्के अल्पसंख्याक जोडा, त्याच 5 टक्के गरीब जोडा, म्हणजेच 90 टक्क्यांपेक्षा जास्त लोक होतात. देशातील 300 मीडिया चॅनेल्सच्या मालकांची यादी काढली. त्यामध्ये, या 90 टक्क्यांपैकी कोणीही नाही. त्यामुळे, भारताचा एक्स रे काढला जाईल, म्हणजेच देशातील जातनिहाय जनगणना केली जाईल, अशीही घोषणा राहुल गांधींनी म्हटले.