Pune Election 2026: पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत असतील तर मी राजीनामा देईन, असा निर्वाणीचा इशारा शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिला आहे. पुण्यात भाजपला (BJP) शह देण्यासाठी अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवार आणि काँग्रेस यांच्यासोबत एकत्र मोट बांधण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. मात्र, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रसेच्या या एकत्रीकरणाला प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी सुरुवातीपासूनच कडाडून विरोध केला आहे. दोन्ही राष्ट्रवादी (NCP) आज एकत्र येण्याची घोषणा झाली तर माझा राजीनामा तयार आहे, असे प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता यावर शरद पवार गटाकडून (Sharad Pawar Camp) कशाप्रकारे तोडगा काढला जाणार, हे बघावे लागेल. तसेच प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिल्यानंतर ते कोणता राजकीय पर्याय आजमवणार याबद्दलही अनेकांना उत्सुकता आहे. 

Continues below advertisement

ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकलं झाली त्यानंतर मी पुण्यात शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा नव्याने बांधली. आगामी महानगरपालिका निवडणुकीत पुण्यात महाविकास आघाडी एकत्र लढली तर शरद पवार गटाला फायदा होईल. याउलट आपण अजित पवारांसोबत लढल्यास आपल्या पक्षाला तोटा होईल. तसेच निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा अजित पवार यांच्याशी युती करुन कार्यकर्त्यांचे मरण होत असेल तर मी पक्षातून बाहेर पडतो. मी अजून राजीनामा दिलेला नाही. पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर मी फक्त शहर अध्यक्षपदाचा नव्हे तर शरद पवार गटाच्या सदस्यत्त्वाचाही राजीनामा देईन, असे प्रशांत जगताप यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता पुढील काही तासांमध्ये यावर तोडगा निघणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

दरम्यान,  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबई प्रदेशची दुपारी 12 वाजता बैठक आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे, मुंबई अध्यक्षा राखी जाधव, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार  आहे. उद्धव ठाकरेंच्या वतीने आलेल्या प्रस्तावावर निर्णय घेऊन आपला निर्णय ठाकरेंना आजच पक्षाच्यावतीने कळविण्यात येईल. अद्याप दोन्ही पक्षात बोलणी सुरू असून चर्चेतून योग्य मार्ग निघेल असा विश्वास शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आहे.

Continues below advertisement

आणखी वाचा

वडील उमेदवारांच्या मुलाखती घेणार अन् मुलगा भाजपमधून लढणार हे कसे चालेल? बापूसाहेब पठारेंवर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांची नाराजी, थेट प्रदेशाध्यक्षांना धाडलं पत्र