Pune Election 2026: राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी (Municipal Election) निवडणूक आयोगाने तारीख जाहीर केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यातील 29 महापालिकांमध्ये 15 जानेवारी रोजी मतदान, तर 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. अशातच पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या (Pune Municipal Election) पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात (NCP Sharad Pawar Faction) मोठी अंतर्गत नाराजी समोर आली आहे.

Continues below advertisement

Pune Election 2026: कार्यकर्त्यांची थेट तक्रार; आमदार पठारे यांच्याबाबत नाराजी

पुण्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटातील कार्यकर्त्यांनी आमदार बापूसाहेब पठारे (Bapusaheb Pathare) यांच्याबाबत पक्ष प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्याकडे थेट नाराजी व्यक्त केली आहे. कार्यकर्त्यांचा सवाल आहे की, “एकीकडे आमदार पठारे पक्षाच्या उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत आणि दुसरीकडे त्यांचाच मुलगा भाजपमधून राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढणार, हे कसे चालेल?” या दुहेरी भूमिकेमुळे पक्षात संभ्रम आणि अस्वस्थता पसरली असून, महापालिका निवडणुकीच्या निर्णय प्रक्रियेतून आमदार बापूसाहेब पठारे यांना बाजूला ठेवण्यात यावे, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून प्रदेशाध्यक्षांकडे करण्यात आली आहे.

Pune Election 2026: मुलाखतीवेळी पठारे उपस्थित, पण मुलगा भाजपमध्ये

दोन दिवसांपूर्वी पुणे महापालिकेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. या मुलाखतीदरम्यान प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासोबत आमदार बापूसाहेब पठारे देखील उपस्थित होते. मात्र, याच काळात पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सुरेंद्र पठारे हे आगामी पुणे महापालिका निवडणूक भाजपकडून लढवण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

Pune Election 2026: पुण्यात भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’ 

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पुण्यात ‘ऑपरेशन लोटस’ राबवून मोठी खेळी केली आहे. पुण्यातील 11 मातब्बर नेत्यांना भाजपने पक्षप्रवेश दिला. मात्र या सर्व प्रवेशांमध्ये सुरेंद्र पठारे यांच्या प्रवेशाने सर्वाधिक खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरेंद्र पठारे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र स्थानिक पातळीवर त्यांच्या प्रवेशाला तीव्र विरोध झाला होता. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भाजप शहराध्यक्षांना पत्र देत, “अशा प्रकारचे प्रवेश घडवून आणू नयेत,” अशी स्पष्ट भूमिका मांडली होती. भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी देखील या प्रवेशाला विरोध केल्याची चर्चा होती. तरीही हा विरोध डावलून पक्षप्रवेश पार पडला.

Pune Election 2026: वडील राष्ट्रवादीत, मुलगा भाजपमध्ये

2014 च्या विधानसभा निवडणुकीत बापूसाहेब पठारे यांनी भाजपमधून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. वडगाव शेरी मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवत राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार सुनील टिंगरे यांचा पराभव करत विजय मिळवला होता. मात्र, अवघ्या एका वर्षातच त्यांचे पुत्र सुरेंद्र पठारे यांनी भाजपमध्ये ‘वापसी’ केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आणखी वाचा

Ajit Pawar & Sharad Pawar: मोठी बातमी : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेत, दादा-ताईंचं बोलणं झालंय, सगळेजण घड्याळावर लढणार, अजितदादांच्या बड्या नेत्याचा मोठा दावा