पुणे: जिल्ह्यातील इंदापूर शहराजवळ शनिवारी रात्री एका सराईत गुन्हेगाराचा गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून खून (Indapur Murder) करण्यात आला होता. या संपूर्ण प्रकरणात आता मोठी माहिती समोर आली आहे. खून करणाऱ्या चार आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. तर आणखीन चार आरोपींचा शोध सुरू आहे. दोन टोळ्यांतील वर्चस्व वादातून हा संपूर्ण प्रकार घडला असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली.
अविनाश धनवे (वय ३१) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. तर ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी शिवाजी बाबुराव भेंडेकर, (वय ३५ वर्षे, रा. पद्मावती रोड, साठेनगर, आळंदी देवाची, ता. खेड, जि. पुणे), मयुर ऊर्फ बाळा मुकेश पाटोळे (वय २० वर्षे, रा. आंबेडकर चौक, पोलीस चौकी समोर, आळंदी देवाची ता. खेड जि पुणे), ,सतिश ऊर्फ सला उपेंद्र पांडे (वय २० वर्षे, रा. शाळा नं. ४, चन्होली रोड, सोपानजाई पार्क, आळंदी देवाची ता. खेड जि पुणे) आणि सोमनाथ विश्वंभर भत्ते (वय २२ वर्षे, रा. मरकळ रोड, सोळू, ता. खेड जि.पुणे) यांना अटक केली आहे. पुणे-कोल्हापूर हायवे रोडवरील शिंदेवाडी गावचे परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापुरातील हॉटेल जगदंब येथे मयत अविनाश बाळु धनवे हा त्याचे इतर तीन मित्र नामे बंटी ऊर्फ प्रणिल मोहन काकडे, राजू एकनाथ धनवडे, राहुल एकनाथ धनवडे यांचे सोबत जेवण करण्यासाठी थांबलेला होता. जेवणाची ऑर्डर देवून चारही मित्र टेबलवर बसलेले असताना आठ जणांच्या टोळीने हातात पिस्तुल, कोयत्याने त्याच्यावर वार करून त्याचा जागीच खून केला. त्यावेळी इतर सोबतचे तीन मित्र हे त्या ठिकाणाहून पळून गेले.
मयत अविनाश बाळू धनवे याची चन्होली, आळंदी परिसरात गुन्हेगारी दहशत होती. तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याचे आळंदी परिसरातील स्थानिक गुन्हेगार टोळी सोबत वैमनस्य असल्याने त्याचा खून त्याचे विरोधी टोळीनेच केला असल्याची माहिती प्राप्त झाली. या गुन्हयातील आरोपी हे कोल्हापूर कडे पळून जात असल्याची बातमी गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली होतीआणि पुणे कोल्हापूर हायवे रोडवरील शिंदेवाडी गावचे परिसरातून 4 जणांना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींवर यापुर्वी खुन, खुनाचा प्रयत्न, मारामारी असे गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्हयातील इतर पाहिजे आरोपींचा शोध चालू आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
आणखी वाचा