Congress President Election: काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक कधी होणार, याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती. अखेर काँग्रेसने आपल्या कार्यकारिणीच्या बैठकीत याची तारीख निश्चित केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक 17 ऑक्टोबरला होणार आहे. यासाठी 22 सप्टेंबरला अधिसूचना जारी होणार आहे. 24 सप्टेंबरपासून नामनिर्देशन सुरू होईल. 17 ऑक्टोबरला मतदान होईल आणि 19 ऑक्टोबरला मतमोजणी आणि निकाल जाहीर होतील. सीडब्लूसीचा (CWC) शिक्कामोर्तब झाल्यानंतर याची औपचारिक घोषणा केली जाईल.


आज दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीत सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी सहभागी झाले होते. या व्यतिरिक्त हरीश रावत, सलमान खुर्शीद, मुकुल वासनिक, मल्लिकार्जुन खर्गे, कुमारी सेलजा, मधुसूदन मिस्त्री, केसी वेणुगोपाल, जयराम रमेश, अजय माकन, अभिषेक मनु सिंघवी यांच्यासह अनेक नेते या बैठकीत काँग्रेस कार्यालयात उपस्थित होते.


सीडब्ल्यूसीच्या बैठकीत पक्षावर नाराज असलेले आनंद शर्माही उपस्थित होते. आनंद शर्मा यांनी शनिवारी संध्याकाळी काँग्रेसचा राजीनामा दिलेल्या गुलाम नबी आझाद यांची भेट घेतली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीडब्ल्यूसी बैठकीत अनेक नेत्यांनी राहुल गांधींना पुन्हा अध्यक्ष होण्यासाठी विचारणा केली आहे.


दरम्यान, काँग्रेस पक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून ‘भारत जोडी यात्रा’ सुरू करणार आहे. 148 दिवसांच्या या यात्रेची सांगता काश्मीरमध्ये होणार आहे. हा पाच महिन्यांचा प्रवास 3,500 किमी आणि 12 राज्यांपेक्षा जास्त अंतर कापून संपणार आहे. या पदयात्रेत दररोज 25 किमी अंतर कापेल जाईल. या पदयात्रेत रॅली आणि जाहीर सभांचा समावेश असेल, ज्यात सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेतेही उपस्थित राहणार आहेत.