नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वायनाड येथील खासादारकीचा राजीनामा दिल्यानंतर येथील पोटनिवडणुकीतून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी खासदार बनल्या. त्यामुळे, आई सोनिया गांधी, भाऊ राहुल गांधी यांच्यानंतर प्रियंका गांधी-वाड्रा (Priyanka Gandhi) याही संसदेत पोहोचल्या आहेत. हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर काही दिवसांपूर्वीच त्यांनी संसदेत खासदारकीची शपथ घेतल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर, आज पहिल्यांदाच त्यांनी संसदेत जोरदार भाषण करत सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल चढवला आहे. आपल्या भाषणात महाराष्ट्रातील निवडणूक निकालानंतर गाजत असलेला मुद्दाही त्यांनी उचलून धरल्याचं दिसून आलं. ईव्हीएमच्या (EVM) मुद्द्यावरुन भाषण करताना बॅलेटवर मतदान करा, म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल, असे प्रियंका गांधी यांनी म्हटलं.
महाराष्ट्राचं, हिमाचल प्रदेश, गोव्याचं सरकार पाडण्याचं काम कोणी केलं? असा सवाल करत येथील सरकार पाडण्यासाठी पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आल्याचा आरोप प्रियंका गांधी यांनी केला आहे. हे सरकार जनतेने निवडले नव्हते का? संविधान या सरकारसाठी लागू नव्हतं का? देशाच्या जनतेला माहिती आहे, यांच्याकडे वॉशिंग मशिन आहे. काही माझे मित्र आहेत. जे इकडं होते, ते तिकडं दिसत आहेत. कदाचित वॉशिंग मशिनमधून धुवून निघाले आहेत, असा हल्लाबोलही त्यांनी काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या नेत्यांवर केला.
देशीतल एकतेचं संरक्षण कवच तोडलं जात आहे. संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचं संविधान डोक्याला लावतात. मात्र, संभल, हाथरस, मणिपूरमध्ये न्याय मागितला जातो, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर घाम दिसत नाही, अशी टीकाही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली. ये भारत का संविधान है, संघ का विधान नही है... अशा शब्दात प्रियंका गांधींनी मोदींवर निशाणा साधला. देशात भीतीचं वातावरण आहे, असं भीतीचं वातावरण इंग्रजाच्या काळात होतं. तिकडच्या बाजूला बसलेल्या विचारधारेच्या लोकांनी इंग्रजांशी साठगाठ केली आहे, असे म्हणत भाजप नेत्यांची तुलना इंग्रजांसोबत केली.
प्रियांका गांधी यांनीही आपल्या भाषणातून महिलांवरील अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांवरही लक्ष्य वेधलं. उत्तर प्रदेशातील संभल इथं नुकत्याच झालेल्या हिंसाचारावरुनही त्यांनी टीका केली. पहिल्या भाषणात प्रियंका गांधी यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात स्वातंत्र्यासाठी योगदान दिलेल्या नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जवाहरलाल नेहरू यांच्या नावांसह स्वातंत्र्य चळवळीतील सर्व नेत्यांचा उल्लेख केला. तर, प्रियंका गांधीनी नेहरूंचे नाव घेतल्यावर काँग्रेसच्या खासदारांनी बाक वाजवून त्यांचे समर्थन केले.
स्वातंत्र्य लढ्यातून संविधानाचा आवाज
"या स्वातंत्र्य लढ्यातून एक आवाज उदयास आला जो आपल्या देशाचा आवाज होता. तो आवाज आज आपले संविधान आहे. तो आवाज धैर्याचा होता आणि त्याच्या प्रति ध्वनीने आपले संविधान लिहिले आहे.", असे प्रियंका गांधी यांनी म्हटले.
हेही वाचा
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी