नागपूर : राज्यात महायुतीमधील सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांकडून आमदारांच्या गाठीभेटी आणि बैठका होत आहे. त्यामध्ये, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदारही उपमुख्यमंत्री शिंदेंना भेटण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर येत आहेत. त्यातच, अजित पवारांच्या (Ajit pawar) गाठीभेटीही वाढल्या आहेत. त्यामुळे, मंत्रिमंडळ विस्ताराच्या कार्यक्रमाला वेग आला असून मुंबईऐवजी आता नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार (Ministry Expansion) करण्यात येणार असल्याचं निश्चित झालं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे 21 मंत्री शपथ घेणार आहेत, तर राष्ट्रवादीचे 10 आणि शिवसेनेच्या 12 मंत्र्यांचा शपथविधी होईल. त्यामध्ये कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपदाचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे नागपुरात (Nagpur) पहिल्यांदाच मंत्र्यांचा शपथविधी होत आहे.
महायुती सरकार चा मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होईल याची चर्चा सुरू आहे. मात्र, सूत्रांकडून जी काही माहिती मिळत आहे, त्याप्रमाणे महायुती सरकारच्या नव्या मंत्र्यांचा शपथविधी 15 डिसेंबर रोजी उपराजधानी नागपूरात होण्याची दाट शक्यता आहे. हा शपथविधी नागपुरात राज्यपाल यांचं निवासस्थान असलेल्या राजभवनात होईल की विधान भवनात हे स्पष्ट नाही. मात्र, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी नागपुरात रविवारी दुपारी 3.00 वाजता होणार असल्याचे समजते. त्या संदर्भात राजभवनात तयारीही सुरू झाल्याची माहिती आहे. त्यामुळे गेल्या 20 दिवसांपासून लागून राहिलेली उत्सुकता आता संपुष्टात आली आहे. मात्र, कोणाला मंत्रिमंडळात संधी मिळणार याबाबत अद्याप निश्चित माहिती नाही. सर्वच पक्षातील संभाव्य मंत्र्यांची नावे समोर आली आहेत.
राज्यातील फडणवीस सरकारचं हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्यामुळे, आमदारांच्या सोईसाठी हा शपथविधी 15 तारखेला नागपुरात होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत असून तयारी सुरू झाल्याची माहिती आहे. 16 तारखेपासून विधीमंडळाचं अधिवेशन असल्यामुळे 15 तारखेला नागपुरात शपथविधी होऊ शकतो, अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे, मुंबईतील राजभवनऐवजी आता नागपुरातच तयारीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, नागपुरात पहिल्यांदाच मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दरबारी जाऊन वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आहे. या भेटीत राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावर त्यांची चर्चा झाली. तर, अजित पवार हेही दोन दिवस दिल्ली दौऱ्यावर होते, त्यांनीही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्याचं पाहायला मिळालं. दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. त्यामुळे,मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा पूर्ण होऊन आता नावांची यादी लवकरच समोर येईल.
हेही वाचा
कहरच... ZP शाळेच्या मैदानावर बॉम्बे डान्स, बिभत्स नृत्याविष्कार; कारवाईची मागणी