Rohini Khadse Pranjal Khewalkar: ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांचे पती प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) यांना पुण्यात ड्रग्ज पार्टीत अटक झाली. सदर प्रकरणी काल पुन्हा न्यायलयात सुनावणी झाली. यावेळी प्रांजल खेवलकर सह पाच पुरुष आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी तर दोन महिला आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान कालच्या या सुनावणीसाठी रोहिणी खडसे देखील वकिलीचा कोट घालून पोहचल्या होत्या. प्राजंल खेवलकर यांच्यावतीनं विजयसिंह ठोंबरे यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर आज रोहिणी खडसे पुणे पोलीस आयुक्तालयात पोहचल्या.
प्रांजल खेवलकर यांना अटक केल्यानंतर त्यांच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधील माहिती आणि फोटो एकनाथ खडसेंच्या विरोधी आमदाराकडे गेल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी केला आहे. त्यासाठी रोहिणी खडसे आणि प्रांजल खेवलकरांच्या वकिलांकडून पुणे पोलीस आयुक्तालयात जाऊन चौकशीची मागणी करणारे पत्र देण्यात आले आहे. दरम्यान एकनाथ खडसेंनी देखील जळगावच्या आमदाराकडे माझ्या जावयाच्या लॅपटॉपमधील फोटो आणि माहिती कशी जाते?, असा सवाल उपस्थित केला होता.
सदर प्रकरणावर काय म्हणाले होते पोलीस आयुक्त?
सदर प्रकरणावर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, जी कारवाई झाली आहे, त्याची विस्तृत माहिती दिलेली आहे. या प्रकरणात पारदर्शक आणि कायदेशीर कारवाई होईल. कोणीही पोलीस दलावर शंका ठेवायची गरज नाही. कोणत्याही प्रकारचे फोटो, व्हिडिओ पोलिसांकडून लीक झालेले नाहीत. पोलीस ठाण्याच्या आतमध्ये सुद्धा रेकॉर्डिंगला बंदी घालता येत नाही. आम्ही काही लीक करत नाही. जे व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असतील त्याला आम्ही थांबवू शकत नाही. कोणतेही फोटो आणि व्हिडिओ पोलिसांकडून लीक झालेले नाहीत, असे स्पष्टीकरण अमितेश कुमार यांनी दिले आहे.
पुणे रेव्ह पार्टीची Inside Story-
आता या प्रकरणाची इनसाईड स्टोरी एबीपी माझाच्या हाती लागली आहे. पार्टी करण्याची हौस असलेल्या प्रांजल खेवलकरांच्या संपर्कात काही दिवसांपुर्वी श्रीपाद यादव आणि निखिल पोपटाणी हे दोघे आले. या दोघांचीही पार्श्वभुमी गुन्हेगारी स्वरुपाची आहे. श्रीपाद यादववर या आधी बेटींग प्रकरणात गुन्हे दाखल असुन त्याला अनेकदा अटक देखील झालीय. तर निखिल पोपटाणी हा सिगारेटचा व्यवसाय करत असला तरी तो देखील बेटींगच्या दुनियेत बुकी म्हणून ओळखला जातो. दोघांनी प्रांजल यांच्या मित्रामार्फत त्यांच्याशी ओळख वाढवली आणि ते प्रांजल खेवलकर यांच्या सर्कलचा भाग बनले. शनिवारी देखील हे दोघे पार्टीत सहभागी झाले. यातील श्रीपाद यादवच्या सांगण्यावरुन दोन महिला तिथे आल्या आणि त्यापैकी एकीच्या पर्समध्ये अंमली पदार्थ सापडल्याचे समोर आले.