Sanjay Raut on PM Modi: भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरनंतर आपण भारत-पाक युद्ध थांबवल्याचा दावा करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पंतप्रधान मोदी (PM Modi) धजावत नाहीत. ते संसदेत डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि चीनचं नाव घ्यायला घाबरतात, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. ते बुधवारी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी संजय राऊत यांनी लोकसभेत मंगळवारी ऑपरेशन सिंदूरबाबत झालेल्या चर्चेचा दाखला देत भाजपवर टीकेचे आसूड ओढले.
ऑपरेशन सिंदूरबाबत संसदेत मांडण्यात आलेल्या चर्चेच्या प्रस्तावावेळी भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव घेतले नाही. चीनने पाकिस्तानला मदत केली, नेटवर्क वापरुन दिलं, शस्त्रास्त्रं पुरवली. तरीही पंतप्रधान मोदी संसदेत चीनचं नाव घ्यायला घाबरतात. मोदींनी आपल्या भाषणात सांगितलं की, शस्त्रसंधीसाठी माझ्यावर कोणाचाही दबाव नव्हता. माझी कोणाशीही चर्चा झाली नाही. मात्र, पंतप्रधान मोदी यांचं संसदेतील भाषण संपल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प पुन्हा म्हणाले की, 'भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध मी थांबवलं'. डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव घ्यायला या सरकारची हातभर का फा#%, हे मला कळत नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले.
यावेळी संजय राऊत यांनी, सरदार वल्लभभाई पटेल यांचा दाखला देत काँग्रेसला लक्ष्य करणाऱ्या अमित शाह यांनाही अंगावर घेतले. अमित शाह यांनी काल लोकसभेतील भाषणात काँग्रेसने वल्लभभाई पटेल यांच्या धोरणांना विरोध केल्याचे वक्तव्य केले होते. त्यासाठी अमित शाह यांनी सरदार पटेल यांचा 1960 सालचा किस्सा सांगितला होता. मात्र, संजय राऊत यांनी याच मुद्द्यावरुन अमित शाह यांच्यावर पलटवार केला. 1950 सरदार पटेलांचं निधन झालं आणि गृहमंत्री अमित शाह त्यांचा 1960 सालचा किस्सा सांगतात. अमित शाह खोटं बोलतात. हा यांचा इतिहास आहे. यांचा इतिहासाशी संबंध नाही, असे राऊत यांनी म्हटले.
काल संसदेत ऑपरेशन सिंदूरबाबत चर्चा सुरु असताना केंद्र सरकारला विरोधकांनी विचारलेल्या एकाही प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे विरोधकांच्या एकाही प्रश्नाचे उत्तर नव्हते. काल संसदेत राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची जोरदार भाषणे झाली. पंतप्रधान मोदी यांचे भाषण देवेंद्र फडणवीस यांच्या भाषेत सांगायचं झालं तर रुदाली होती, असा टोलाही संजय राऊतांनी लगावला.
Devendra Fadnavis: महाराष्ट्रात फडणवीस अॅक्ट चालतो; संजय राऊतांचा टोला
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा न घेतल्याच्या मुद्द्यावरुन संजय राऊत यांनी महायुती सरकारवर टीका केली. महाराष्ट्र सध्या फडणवीस अॅक्ट चालतो. मंत्र्यांना समज द्या आणि सोडून द्या, असा प्रकार चालतो. मिंधे गटाच्या नेत्यांना इशारा देण्याचे काम कोणीतरी करत आहे. एक दिवस देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर कॅबिनेटमध्ये गँगवॉर होईल. मी जे बोलतो ते कालांतराने खर ठरतं. ही धुसफूस वाढत जाणार आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.
आणखी वाचा