Pune Rave Party Pranjal Khewalkar: ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) यांना पुण्यात ड्रग्ज पार्टीत अटक झाली. सदर प्रकरणी काल पुन्हा न्यायलयात सुनावणी झाली. यावेळी प्रांजल खेवलकर सह पाच पुरुष आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी तर दोन महिला आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आता या प्रकरणाची इनसाईड स्टोरी एबीपी माझाच्या हाती लागली आहे.

पार्टी करण्याची हौस असलेल्या प्रांजल खेवलकरांच्या संपर्कात काही दिवसांपुर्वी श्रीपाद यादव आणि निखिल पोपटाणी हे दोघे आले. या दोघांचीही पार्श्वभुमी गुन्हेगारी स्वरुपाची आहे. श्रीपाद यादववर या आधी बेटींग प्रकरणात गुन्हे दाखल असुन त्याला अनेकदा अटक देखील झालीय. तर निखिल पोपटाणी हा सिगारेटचा व्यवसाय करत असला तरी तो देखील बेटींगच्या दुनियेत बुकी म्हणून ओळखला जातो. दोघांनी प्रांजल यांच्या मित्रामार्फत त्यांच्याशी ओळख वाढवली आणि ते प्रांजल खेवलकर यांच्या सर्कलचा भाग बनले. शनिवारी देखील हे दोघे पार्टीत सहभागी झाले. यातील श्रीपाद यादवच्या सांगण्यावरुन दोन महिला तिथे आल्या आणि त्यापैकी एकीच्या पर्समध्ये अंमली पदार्थ सापडल्याचे समोर आले.

प्रांजल खेवलकरांचे वकील काय म्हणाले?

सदर प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर प्रांजल खेवलकर यांचे वकील विजयसिंह ठोंबरे यांनी माध्यमांशी संवाद साधत सर्व माहिती दिली. एफआयआरआणि पंचनाम्यामध्ये सगळं आहे.  महिलेकडे गांजा आणि कोकेन सापडलं आहे त्याच महिलेला MCR देण्यात आली आहे. प्रांजलने कुठलही ड्रग्स सेवन केलं नव्हतं.  प्रांजलचे महिलेशी कुठल्याही प्रकारचे संबंध नाहीत, हे सगळं प्रकरण बनावट आहे,त्या महिलेने हे अमली पदार्थ आणले होते. सगळ ट्रॅप रचला होता, असं विजयसिंह ठोंबरे म्हणाले. प्रांजल खेवलकर यांच्याकडे अंमली पदार्थ मिळून आलेला नाही. व्हिडिओ काढले गेले त्या संदर्भात पत्र देऊन उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. कुटुंबाची बदनामी करण्यासाठी व्हिडिओ देण्यात आले. अंमली पदार्थ सेवनाबाबतचा अहवाल का समोर येत नाही.  व्हिडिओ शूटिंग मध्ये सगळ्यांना दिसत आहे की महिला पर्समधून अंमली पदार्थ काढत आहे, असं विजयसिंह ठोंबरेंनी सांगितले. 

अटक करण्यात आलेल्या सात आरोपींची नावे

  • प्रांजल मनिष खेवलकर(41)
  • निखिल जेठानंद पोपटाणी (35)
  • समीर फकीर महमंद सय्यद (41)
  • सचिन सोनाजी भोंबे (42)
  • श्रीपाद मोहन यादव (27)
  • ईशा देवज्योत सिंग (23)
  • प्राची गोपाल शर्मा (22)

संबंधित बातमी:

Pune Rave Party Pranjal Khewalkar: जावयाला सोडवण्यासाठी एकनाथ खडसेंनी घेतली बड्या वकीलाची मदत, रोहिणी खडसे पोलीस आयुक्तांना भेटल्या, पडद्यामागे हालचालींना वेग