अकोला : लोकसभा निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आपली ताकद वाढवण्यासाठी सत्ताधारी महायुती (Mahayuti) आणि विरोधी बाकावरील महाविकास आघाडीकडून (मविआ) (Maha Vikas Aghadi) प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मविआकडून वंचित बहुजन आघाडी (VBA) या पक्षाला सोबत घेण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. मात्र या प्रयत्नांना अद्याप यश आलेले नाही. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना अधिक जागा हव्या आहेत. युती न झाल्यास आम्ही सर्व जागा स्वबळावर लढवू अशी भूमिका प्रकाश आंबेडकरांनी घेतली आहे. असे असतानाच त्यांनी आता तेलंगणातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) प्रमुख के. चंद्रशेखर राव (K chandrashekar Rao) यांच्याशी फोनवर चर्चा केल्याचे म्हटले जात होते. मात्र या चर्चेचे वृत्त प्रकाश आंबेडकर यांनी फेटाळले आहे..
केसीआर आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात चर्चा झाली नाही.
प्रकाश आंबेडकर आणि के. चंद्रशेखर राव यांच्यात फोनद्वारे चर्चा झाल्याचे म्हटले जात होते. या चर्चेमध्ये केसीआर यांनी राज्यात वंचितसोबत निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असा दावा करण्यात आला होता. तसा प्रस्ताव घेऊन भारत राष्ट्र समितीचे मराठवाड्यातील नेते कदीर मौलाना यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतल्याचेही सांगितले जात होते. मात्र प्रकाश आंबेडकरांनी हे वृत्त फेटाळले आहे.
आंबेडकरांना केलं होतं आमंत्रित
तसं पाहायचं झाल्यास प्रकाश आंबेडकर आणि केसीआर यांच्यात चांगले संबंध आहेत. तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री असताना केसीआर यांनी प्रकाश आंबेडकरांना दोन मोठ्या शासकीय कार्यक्रमांना आमंत्रित केलं होतं. विशेष म्हणजे आंबेडकरांनी त्या कार्यक्रमांना हजेरीदेखील लावली होती. तेलंगणाच्या दौऱ्यावर असताना बीएरएसने प्रकाश आंबेडकरांचे जोरदार स्वागत गेले होते.
वंचित आघाडी स्वबळावर लढणार
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत जागावाटपावरून चर्चा चालू आहे. त्यासाठी मविआच्या घटकपक्षांच्या अनेकवेळा बैठका झाल्या. आगामी एक ते दोन दिवसांत लवकरच उमेदवारांची घोषणा केली जाणार आहे. मात्र मविआकडून वंचितला किती जागा दिल्या जाणार हे अद्याप अस्पष्ट आहे. दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांनी ही निवडणूक स्वबळावर लढवण्याचीही तयारी चालू केली आहे. त्यामुळे आगामी काळात नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
केसीआर यांच्याकूडन पक्षविस्ताराचा प्रयत्न
दरम्यान, बीआरएस हा मुळचा तेलंगणा राज्यातील पक्ष आहे. या पक्षाची तेथे चांगली ताकद आहे. सध्या हा पक्ष तेलंगणात प्रमुख विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या तेथील विधानसभा निवडणुकीत या पक्षाचा पराभव झाला होता. त्यामुळे केसीआर यांना आपली मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागली होती. मुख्यमंत्रिपदी असताना केसीआर यांनी आपल्या पक्षाचे तेलंगणा राष्ट्र समिती हे नाव बदलून भारत राष्ट्र समिती असे केले होते. पक्षाचा भारतभरात विस्तार करण्याचा विचार यामागे होता. त्यांनी महाराष्ट्रात शक्तीप्रदर्शनही केले होते. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत बीआरएस महाराष्ट्रात काय करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.