PM Narendra Modi Security Breach In Karnataka: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत पुन्हा एकदा चूक झाल्याची बातमी समोर आली आहे. पंतप्रधान मोदींच्या कर्नाटक दौऱ्यादरम्यान शनिवारी (25 मार्च) ही चूक झाली. पंतप्रधान मोदींची गाडी दावणगिरीतून जात असताना एक तरुण त्यांच्या गाडीजवळ पोहोचला. पंतप्रधानांच्या रोड शो दरम्यान तरुण ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न करत होता. मात्र सुरक्षेत तैनात असलेल्या पोलिसांनी या तरुणाला तात्काळ पकडले. तरुणाची चौकशी केली जात आहे. तीन महिन्यांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत चूक झाल्याचं आढळून आलं आहे. तत्पूवी जानेवारीत कर्नाटकातील हुबळी येथे पंतप्रधान  मोदींच्या रोड शो दरम्यान एक तरुण सुरक्षा कवच तोडत त्यांच्या जवळ आला होता.


PM Narendra Modi Security Breach In Karnataka: पंतप्रधान मोदींच्या दिशेने धावला तरुण  


कर्नाटकात मे महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने शनिवारी (25 मार्च) दावणगेरे येथे ‘विजय संकल्प यात्रा’ सुरू केली आहे. भाजपच्या प्रचाराचा एक भाग म्हणून पंतप्रधान मोदी कर्नाटकात पोहोचले आणि दावणगेरेमध्ये एका विशाल जाहीर सभेला संबोधित केले. मात्र त्याआधी त्यांनी रोड शो केला. या रोड शो दरम्यान एका तरुणाने अचानक सुरक्षा कवच तोडला आणि तो पंतप्रधान मोदींच्या गाडीकडे जाऊ लागला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले.


PM Narendra Modi Security Breach In Karnataka: घटनेचा व्हिडीओ आला समोर 


एएनआय या वृत्तसंस्थेने पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेतील त्रुटीचा व्हिडीओ शेअर केला आहे. पोलिसांच्या हवाल्याने या व्हिडीओला दुजोरा देण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, दावणगेरे येथील रोड शो दरम्यान जेव्हा पीएम मोदींचा ताफा रस्त्यावरून जात होता, तेव्हा मोठ्याने 'मोदी-मोदी'च्या घोषणा दिल्या जात आहेत. लोक रस्त्याच्या कडेला उभे राहून घोषणा देत आहेत, त्याच दरम्यान चेक शर्ट आणि निळी जीन्स घातलेला एक तरुण अचानक धावताना दिसतो. हा तरुण मोदींच्या गाडीसमोर जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यावेळी पंतप्रधान मोदी हात दाखवत जनतेला अभिवादन करत आहेत. पोलीस या तरुणाला पकडलं आणि पंतप्रधानांचा ताफा पुढे सरकतो.