पुणे : महाराष्ट्रातल्या एका नेत्यामुळे राजकारण अस्थिर झालं आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. गरीबी कधी हटवणार असं विचारलं तरा राहुल गांधी म्हणतात खटाखट असं म्हणत मोदींनी राहुल गांधींवरही निशाणा साधला आहे. पुण्यातील रेसकोर्स मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीच्या प्रचारार्थ सभेत हे वक्तव्य केलं आहे. पुणे तिथे काय उणे. या भूमीवर महात्मा फुले, जोतिबा फुले यांच्यासारखे समाजसुधारक दिले. पुणे जेवढं प्राचीन आणि तेवढंच फ्युचरिस्टिट आहे, असंही मोदी यांनी म्हटलं आहे. 


महाराष्ट्रातल्या एका नेत्यामुळे राजकारण अस्थिर


पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले की, काही भटके आत्मे आहेत. स्त्रीची इच्छा पूर्ण झाली नाही तर ती भटकत राहते. ती स्वतःही समाधानी नाही आणि इतरांनाही अस्थिर करत राहते. महाराष्ट्रातील एका नेत्याने हा खेळ 45 वर्षांपूर्वी सुरू केला. त्यानंतर अनेक मुख्यमंत्र्यांची पदे अस्थिर झाली. हे भटके आत्मे केवळ विरोधकांनाच अस्थिर करत नाहीत, तर स्वतःच्या पक्षालाही अस्थिर करतात. एवढेच नाही तर, स्वतःच्या कुटुंबातही अस्थिरता निर्माण होते. या भटक्या आत्म्याने 1995 च्या आघाडी सरकारलाही अस्थिर करण्याचा प्रयत्न केला होता आणि 2019 मध्ये या आत्म्याने जनादेशाचा अपमान केला होता, असं म्हणत मोदींनी नाव न घेता शरद पवारांवर निशाणा साधला आहे.


लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमध्ये प्रवास


60 वर्षांपर्यंत राज्य केलं, पण देशातील अर्ध्या जनतेला मूलभूत सुविधाही देऊ शकले नाही. आम्हाला फक्त 10 वर्ष सेवा करण्याची संधी मिळाली. या दहा वर्षांत मूलभूत सुविधांसोबत जनतेच्या आकांक्षाही पूर्ण केल्या आहेत. गावागावात चांगले रस्ते मूलभूत सुविधा पाहून चांगलं वाटतं की नाही. पुणे मेट्रो पाहा, पुणे विमानतळ पाहा, समृद्धी महामार्ग पाहा, हे आधुनिक भारताचं चित्र आहे. महाराष्ट्राच्या जनतेला ही मोदीची गँरेंटी आहे की, तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमध्ये प्रवास कराल, असं आश्वासन मोदींनी दिलं आहे.


येत्या काळात पुणे ऑटोमोबाईल हब बनेल


2014 आधी भारत मोबाईल आयात करायचा. मोदी सरकार आल्यानंतर भारत आता मोबाईल निर्यात करतो. मेड इन इंडिया चिपही जगभरात निर्यात केली जाणार आहे. देशाला तरुणी पिढीवर विश्वास आहे. भारताच्या तंत्रज्ञानावर विश्वास आहे. पुण्यातील तरुण बुद्धीमान आहे, येत्या काळात पुणे ऑटोमोबाईल हब बनेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे.


पाहा व्हिडीओ : पुण्यात नरेंद्र मोदींची सभा