पंढरपूर: माढा लोकसभा राज्यातील हॉट सीट बनल्यानंतर आता 30 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विराट सभा होत असून याची जोरदार तयारी सुरु आहे. मोहिते पाटील यांच्या बालेकिल्ल्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) नेमकं काय बोलणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले असून शरद पवार यांनी हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केल्यानंतर आता पंतप्रधान मोदीही माढा लोकसभेसाठी (Madha Loksabha) सभा घेणार आहेत.  या सभेची जागा निवडतानाही भाजपने मोहिते पाटील याना धक्का देत थेट मोहिते-पाटील (Mohite Patil) यांच्या होमग्राऊंडवर माळशिरस येथे सभा घेत आहेत. 


माळशिरस शहराला चिटकून असलेल्या कृषी विभागाच्या 28 एकर जागेची निवड केली होती . आता या मैदानाचे सपाटीकरणासोबत सभेसाठी अजस्त्र मंडप उभारण्याचे काम वेगात सुरु आहे . यासाठी माण खटावचे आमदार जयकुमार गोरे , फलटणचे जयकुमार शिंदे , भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार आणि केंद्र व राज्य सरकारचे अधिकारी येथे तळ ठोकून आहेत . 


माढ्यात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासमोर शरद पवार यांनी धैर्यशील मोहिते-पाटील यांना रिंगणात उतरवून भाजपसमोर आव्हान निर्माण केले आहे. मोहिते-पाटील घराण्याचा प्रभाव माढ्यासोबत सोलापूरमध्येही आहे. परिणामी भाजपला दुहेरी फटका बसू शकतो. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माढ्यातील सभा अनेक अर्थांनी महत्त्वाच मानला जात आहे.


मोदींच्या सभेने मोहिते पाटलांचा भ्रम दूर होणार: जयकुमार गोरे


माळशिरस येथील सभेतून जनता मोहिते पाटील यांच्यासोबत आहे की भाजपच्या हे दिसून येईल, असा टोला आमदार जयकुमार गोरे यांनी लगावला.  या सभेला एक लाखापेक्षा जास्त नागरिक येणार असल्याचा दावा यावेळी आमदार गोरे यांनी केला . पंतप्रधान मोदी यांना पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक या सभेला येणार असून हे मैदान कमी पडेल अशी भीतीही गोरे यांनी व्यक्त केली . माळशिरस म्हणजे मोहिते पाटील हे समीकरण चुकीचे असून त्यांच्या विरोधकांची संख्या खूप जास्त असल्याचा दावा गोरे यांनी केला . 

मोदी यांच्या सभेनंतर भाजप उमेदवार रणजित निंबाळकर याना मोठा फायदा होईल असा होरा भाजपचा असून माळशिरस मध्ये सभा घेत मोहिते पाटील आणि उत्तम जानकर याना मोठा धक्का देण्याची तयारी केली आहे . यासाठी माळशिरस परिसरातील वाहतूक व्यवस्थेतही मोठे बदल करण्यात आले आहेत .


आणखी वाचा


देवेंद्र फडणवीसांनी मर्जीतील शिलेदारांवर सोपवली महत्त्वाची जबाबदारी, शेवटच्या क्षणापर्यंत माढा आणि सोलापुरात तळ ठोकणार