PM Modi Japan Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जपानच्या दौऱ्यावर आहेत. आज पंतप्रधान मोदी यांनी येथील भारतीय समुदायाला संबोधित केले. पंतप्रधानांनी आपल्या संबोधनात सांगितले की, मी जेव्हा-जेव्हा जपानमध्ये येतो, तेव्हा प्रत्येक वेळी तुमच्या प्रेमाचा वर्षाव होत असल्याचे मला दिसते. तुमच्यापैकी बरेच मित्र अनेक वर्षांपासून इथे स्थायिक झाले आहेत. जपानची भाषा, वेशभूषा, संस्कृती आणि खाद्यपदार्थ एक प्रकारे तुमच्या जीवनाचा भाग बनले आहेत.


पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपण कर्मभूमीशी शरीर आणि मनाने जोडले जाणे हे आपले वैशिष्ट्य आहे. पण मातृभूमीच्या मुळाशी असलेले नाते ते त्यापासून कधीच अंतर करू देत नाहीत. ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. पंतप्रधान पुढे म्हणाले की, विवेकानंद त्यांच्या ऐतिहासिक भाषणासाठी शिकागोला जाण्यापूर्वी जपानला आले होते. जपानने त्यांच्या मनावर खोलवर छाप सोडली. जपानमधील लोकांची देशभक्ती, जपानमधील लोकांचा आत्मविश्वास, जपानमधील लोकांची स्वच्छतेसाठी असलेली जागरुकता यांची त्यांनी उघडपणे प्रशंसा केली होती.


भारत आणि जपान हे पारंपरिक भागीदार आहेत


पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत आणि जपान हे पारंपरिक भागीदार आहेत. भारताच्या विकासाच्या प्रवासात जपानने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जपानशी आमचे नाते जिव्हाळ्याचे, अध्यात्माचे, सहकार्याचे, आपुलकीचे आहे. जपानसोबतचे आमचे नाते हे जगासाठी सामर्थ्य, आदर आणि समान संकल्पाचे आहे. जपानशी आमचे नाते बुद्धाचे, ज्ञानाचे, ध्यानाचे आहे. भगवान बुद्धांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याची आजच्या जगाला खूप गरज आहे. आज जगासमोरील सर्व आव्हाने, मग ती हिंसा, अराजकता, दहशतवाद, हवामान बदल यापासून मानवतेला वाचवण्याचा हा मार्ग आहे. भारताचे भाग्य आहे की त्याला भगवान बुद्धांचा प्रत्यक्ष आशीर्वाद लाभला आहे. त्यांच्या विचारांना आत्मसात करून भारत मानवतेची सेवा करत आहे. कितीही आव्हाने असोत, भारत नेहमीच त्यावर उपाय शोधतो.


भारत-जपानी सहकार्याची दिली उदाहरणे


पंतप्रधान मोदी म्हणाले, भारतात नवीन क्षमतेच्या उभारणीत जपान महत्त्वाचा भागीदार आहे. यात मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे असो, दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर असो, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर असो, ही भारत-जपान सहकार्याची उत्तम उदाहरणे आहेत. गेल्या 8 वर्षात आम्ही लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचे माध्यम बनवले आहे. आज भारत ग्रीन फ्युचर, ग्रीन जॉब्स रोडमॅपसाठी खूप वेगाने पुढे जात आहे. भारतात इलेक्ट्रिक मोबिलिटीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जात आहे. हायड्रोकार्बन्सला पर्याय म्हणून ग्रीन हायड्रोजन बनवण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.