मुंबई: भारतात 2004 साली भाजपने 'शायनिंग इंडिया' मोहीमेतंर्गत लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु केला होता. या निवडणुकीत अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्त्वाखालील भाजप विजय होईल, अशी खात्री अनेकांना होती. मात्र, तेव्हा माझे मत वेगळे होते. अखेर लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर आला तेव्हा माझं मत खरं ठरलं, असे वक्तव्य शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले. तेव्हाच्या आणि आताच्या स्थितीत साम्य आहे. त्यामुळे सध्या भाजपकडून '400 पार'चा कितीही प्रचार केला जात असला तरी लोकसभा निवडणुकीच्या निकालात वेगळे चित्र पाहायला मिळेल, असा आशावाद शरद पवार यांनी व्यक्त केला. ते नुकतेच 'बोल भिडू' या वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
यावेळी शरद पवार यांना लोकसभा निवडणुकीचा नेमका रागरंग काय आहे, याविषयी विचारण्यात आले. त्यावर शरद पवार यांनी म्हटले की, माझी खात्री आहे की, सध्या लोक गप्प आहेत. कारण लोकांमध्ये मोदींची दहशत आहे. त्यामुळे लोक सध्या कोणतीही प्रतिक्रिया देताना दिसत नाहीत. पण लोक मतदानाला जातील तेव्हा प्रतिक्रिया देतील आणि ही प्रतिक्रिया मोदीविरोधी असेल, याबाबत माझ्या मनात शंका नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.
2004 ला भाजपचे लोकसभा निवडणूक प्रचाराचे नियोजन प्रमोद महाजन करत होते. त्यावेळच्या लोकांनी 'फिल गुड', 'शायनिंग इंडिया'चा प्रचार सुरु केला होता. तेव्हा संपूर्ण मिडिया आणि माझे काही सहकारीही वाजपेयी साहेब पुन्हा पंतप्रधान होतील, असे सांगत होते. पण तेव्हा माझं मत वेगळं होतं. हे मत अखेर खरं झालं होतं. त्यावेळी वाजपेयी यांनी कधीही स्वत: विजयाचा दावा केला नाही. आता मोदी स्वत: त्याविषयी बोलत आहेत. वाजपेयी हे उत्तम वक्ते होते, त्यांच्या सभांना गर्दी होत असे. ते सुसंस्कृत होते. मात्र, आज मोदींच्या प्रचारात या सगळ्याची कमतरता दिसते. ते लोकांवर व्यक्तिगत हल्ले करतात. अटलबिहारी वाजपेयी हे देशात काय करणार आहेत? समस्या कोणत्या आहेत?, यावर भाषणांमध्ये बोलायचे. संसदीय लोकशाहीत सगळ्यांना पुढे घेऊन जाण्यावर त्यांचा ठाम विश्वास होता. पण मोदींचं एकूण धोरण पाहता कोणाला त्यांच्यासोबत जावंसही वाटत नाही. त्यांच्याकडून 'चारसो पार'सारख्या आधार नसलेल्या घोषणा दिल्या जात आहेत, असे शरद पवारांनी म्हटले.
पंतप्रधान मोदींच्या 'भटकती आत्मा' टीकेवर शरद पवारांचं भाष्य
पुण्यातील सभेत पंतप्रधान मोदी यांनी शरद पवारांचा उल्लेख अप्रत्यक्षपणे 'भटकती आत्मा' असा केला होता. याविषयी शरद पवार यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, मोदींना जे साध्य करायचं आहे, ते साध्य करण्याची स्थिती सध्या नाही. लोकांचा पाठिंबा घसरतो आणि जेव्हा सत्ता आपल्या हातातून जाईल, अशी स्थिती निर्माण होते तेव्हा टोकाची भूमिका घेतली जाते. अशावेळी संबंधित व्यक्तीचं स्वत:वर नियंत्रण राहत नाही. हे नियंत्रण सुटल्यामुळे पंतप्रधानपदाची गरिमा ठेवण्याचं स्मरणही मोदींना होत नाही. त्यामुळे ते वाट्टेल ते बोलतात. त्यांना महत्त्वाच्या वाटणाऱ्या विरोधकांविषी बोलतात. हा त्यांचा दृष्टीकोन आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.
मोदींच्या कामकाजाची एकूण पद्धत पाहता ते जनमानसासमोर आपण केलेले काम मांडण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. मनमोहन सिंग हे पंतप्रधान असताना वर्षातून एकदा प्रसारमाध्यमांशी बोलून आपण काय निर्णय घेतले, याची माहिती देत असत. त्यावेळी त्यांना हवे ते प्रश्न विचारण्याची संधी असे. दहा वर्षे मनमोहन सिंग यांनी पत्रकार परिषद घेण्याची प्रथा पाळली. पण मोदींनी गेल्या 10 वर्षांमध्ये एकदाही पत्रकारांना वेळ दिलेला नाही. लोकांशी आणि मीडियाशी सुसंवाद ठेवण्यावर मोदींचा विश्वास नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.
आणखी वाचा