अकोला: परभणी दंगलीत (Parbhani Violence) न्यायालयीन कोठडीत मरण पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशींचे (Somnath Suryawanshi) कुटुंबीय वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या भेटीला अकोल्यात आले आहे. अकोल्यातील कृषीनगर भागातल्या यशवंत भवन या निवासस्थानी सूर्यवंशी कुटुंबियांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. सोमनाथ सूर्यवंशी यांची आई, भाऊ, काका आणि मावशी यांनी ही भेट घेतली आहे. आई विजयाबाई व्यंकट सुर्यवंशी, भाऊ प्रेमनाथ सुर्यवंशी, मावशी तेजश्री दिगंबर विटकर, मावसा दिगंबर यलप्पा विटकर यांचा यात समावेश आहे. 


सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलिसांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष


या भेटी दरम्यान, सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांनी प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत खळबळजनक‌ गौप्यस्फोट केला आहे.‌ सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलिसांनी 50 लाख आणि नोकरीचा आमिष दिल्याचा सोमनाथ सूर्यवंशीचा भाऊ प्रेमनाथने हा खळबळजनक‌ आरोप केला आहे. सोमनाथच्या मृत्यूनंतर आपल्याला गप्प बसण्याचा पोलिसांनी सल्ला दिला होता, असा सोमनाथच्या भावाचा आंबेडकरांशी बोलताना दावा आहे. सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांच्या दाव्यानंतर प्रकरणातील नवीन तथ्य समोर आले आहे.


प्रकाश आंबेडकरच आपल्याला न्याय मिळवून देतील


सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूनंतर आतापर्यंत झालेल्या सर्व घडामोडींवर सोमनाथच्या कुटुंबियांनी प्रकाश आंबेडकरांशी चर्चा केली. राज्यात संतोष देशमुख यांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूवरून राजकारण तापलेले असताना सूर्यवंशी कुटुंबीयांनी आंबेडकरांची भेट घेतली. या आधी आंबेडकरांनी परभणीत सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची आत्तापर्यंत राहुल गांधींसह राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांनी घेतली भेट. दरम्यान, प्रकाश आंबेडकरच आपल्याला न्याय मिळवून देतील अशी सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना आशा आहे.


नेमकं काय आहे प्रकरण?


परभणीमध्ये मंगळवारी 10 डिसेंबरला स्टेशन रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करून विटंबना करण्यात आली. या विटंबनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी बुधवारी 11 डिसेंबर रोजी परभणी जिल्हा बंदची हाक दिली होती. या बंददरम्यान परभणीत जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. त्यानंतर परभणी पोलिसांनी कोंबिग ऑपरेशन राबवत गुन्हे दाखल केले आणि त्यांना अटक केली.


अटक केलेल्यांपैकी सोमनाथ सूर्यवंशी या 35 वर्षीय तरूणाचा रविवारी सकाळी न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. सोमनाथ सूर्यवंशीच्या शरीरावर अनेक जखमा असल्याने सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळेच सोमनाथचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात असून सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार धरून परभणी एलसीबीचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने बडतर्फ करण्याची मागणी आंबेडकरी अनुयायांनी केली होती.


हे ही वाचा