Beed Crime : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली. या हत्येच्या घटनेने राज्यासह देशात हे प्रकरण चांगलेच गाजलं आहे. या घटनेमुळे बीड जिल्ह्याचे नाव आणि तेथील गुन्हेगारी सध्या चर्चेचा विषय बनला आहे. संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ काल (28 डिसेंबर) बीडमध्ये (Beed) सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला. तर या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे. 


अशातच, बीड जिल्ह्यात मागील पाच वर्षात तब्बल 308 खुनाचे गुन्हे दाखल आले असून ज्यापैकी 295 खून प्रकरण उघड झाले आहे. तर  अद्याप 13 खून प्रकरण उघड झालेले नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. तर मागील पाच वर्षात खुनाचे प्रयत्नाचे तब्बल 765 गुन्हे दाखल झाले असून यापैकी 760 प्रकरण उघड झाले आहे तर 5 प्रकरणाचा अद्याप उलगडा झाला नसल्याची आकडेवारी समोर आली आहे.


बीड पोलीस अधिक्षक कार्यालयातून खळबळजनक आकडेवारी समोर


बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीची पुढे आलेल्या आकडेवारीनुसार मागील पाच वर्षात बीड जिल्ह्यात 782 बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी 777 गुन्ह्यांचा उलगडा झाला असून यातील 5 प्रकरण अद्याप उघड झालेले नाहीत. बीड पोलीस अधिक्षक कार्यालयातील माहितीतून या गुन्ह्यांची माहिती उघड झालीय.  कोरोना काळात दोन वर्षात लॉकडाऊन असताना देखील बीड मध्ये 2020 मध्ये 32 तर 2021 मध्ये 59 हत्येचे गुन्हे दाखल करण्यात आलेत. तर 2024 म्हणजे या वर्षी नोव्हेंबर पर्यंतच्या माहितीनुसार बीडमध्ये 39 हत्येचे गुन्हे दाखल आहेत आणि या सर्व गुन्ह्यांचा उलगडा झालाय. दरम्यान, मागील पाच वर्षाच्या तुलनेत खुनाच्या प्रयत्नाचे सर्वात जास्त गुन्हे यंदाच्या वर्षी दाखल झालेआहेत. तर तब्बल 177 खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे यंदाच्या वर्षी दाखल आहेत. बीड पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या माहितीनुसार या गुन्ह्यांची ही आकडेवारी समोर आलीय. 


चेंबूर नाका येथे सकल मराठा समाजाकडून तीव्र आंदोलन 


बीड जिल्ह्यातील मत्साजोगा गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येच्या निषेधार्थ आज चेंबूर नाका येथे सकल मराठा समाजाकडून तीव्र आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनात सहभागी झालेल्या समाजाच्या नेत्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचा तीव्र निषेध व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने कारवाई करावी, तसेच धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली आहे  आंदोलनादरम्यान, काही आंदोलनकर्त्यांनी बांगडी आणि साडी दाखवत न्यायव्यवस्थेवर तीव्र टिप्पणी केलीय. त्यांच्या मते, प्रशासन आणि न्यायव्यवस्था गुन्हेगारांना योग्य शिक्षा देण्यात अपयशी ठरत आहे. यासोबतच, आरोपींना फाशीची मागणी करत शासनावर दबाव आणण्याचा इशारा दिला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या