Parbhani Lok Sabha Constituency : आगामी लोकसभा निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असतानाच, महायुतीची अडचण वाढवणारी घोषणा राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर (Mahadev Jankar) यांच्याकडून करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) आपण राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची माहिती जानकर यांनी दिली आहे. त्यांच्या या भुमिकेमुळे महायुतीची अडचण वाढण्याची शक्यता आहे.
परभणी लोकसभा मतदारसंघात ओबीसी मतदार जास्त असल्यामुळे आपण लोकसभा निवडणुकीत परभणी मतदारसंघातून रासपच्या चिन्हावर लढवणार आहोत. ना महायुती, ना आघाडी करणार अशी प्रतिक्रिया रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी फोनवरून दिली आहे. दरम्यान याबाबत व्हिडिओ बाईट मात्र देण्यास त्यांनी नकार दिला आहे. त्यांच्या या राजकीय भुमिकेमुळे आता चर्चेला उधाण आले आहे.
परभणीत आमची ताकद मोठी...
दरम्यान याबाबत बोलतांना जानकर म्हणाले की, "परभणी लोकसभा मतदारसंघाबाबत मागच्या अनेक दिवसांपासून मी तयारी करत असून, माझे जवळपास 90 टक्के बूथ कमिट्या झाल्या आहेत. जेव्हा शंभर टक्के हे काम होईल तेव्हा मी परभणीत येऊन मतदारांच्या गाठीभेटी घेणार आहे. या मतदारसंघात आमचा एक आमदार असून, इतरही स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत. या भागात पक्षाची ताकद मोठी आहे. तसेच, ओबीसी मतदार इथे जास्त असल्यामुळे परभणी लोकसभेची निवडणूक लढवून ती जिंकणारच असं महादेव जानकर यांनी सांगितल आहे.
महायुतीची मोठी अडचण होण्याची शक्यता...
दरम्यान महादेव जानकर यांच्या या निर्णयामुळे महायुतीची मोठी अडचण होण्याची शक्यता आहे. मात्र, येत्या काळात महादेव जानकर खरंच रासपच्या चिन्हावर स्वतंत्र लढणार का? महायुतीमध्ये सामील होणार की आघाडीत सामील होणार हे मात्र येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. परंतु, त्यांच्या या घोषणेमुळे परभणी लोकसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीत परभणी ठाकरे गटाकडे...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जागावाटपाच्या घडामोडींना वेग आला असून, मराठवाड्यातील आठही जागांबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात आहेत. विशेष म्हणजे परभणी लोकसभा मतदारसंघ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे असणार असल्याचे निश्चित झाले आहे. 2019 मध्ये ज्या पक्षाने जी जागा जिंकली होती, 2024 मध्येही त्याच पक्षाने ती जागा लढावी असा तिनही पक्षात ठरले आहेत. त्यानुसार परभणी लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाला मिळणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी! मविआच्या मराठवाड्यातील जागावाटपाचं 'गणित' ठरलं?; पाहा कोणाकडे कोणती जागा