Parbhani: राज्यात सध्या विधानसभा निवडणूकीचे वारे वाहत असून सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केल्याचे दिसते. विविध राजकीय पक्ष विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेत असतानाचे चित्र असतानाच परभणीच्या जिंतूरमधील राजकीय गणिते बदलताना दिसत आहेत. काँग्रेसचे आमदारकीसाठी इच्छूक उमेदवार सुरेश नागरे यांनी स्वत:च्या उमेदवारीसाठी जुळवाजुळव सुरु केली असून माजी जिल्हा परिषद अध्यक्षांसह नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय.
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रसाद बुधवंत यांच्यासह तीन नगरसेवक आणि इतर पदाधिकाऱ्यांनी काँगेंसमध्ये प्रवेश केलाय. काँग्रेसचे नेते सुरेश नागरे यांच्या नेतृत्वाखाली प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला आहे.यावेळी आता शेवटपर्यंत याच तिरंग्यात राहायचं असे आवाहन नाना पटोले यांनी पदाधिकाऱ्यांना केलं आहे.
कोणत्या पदाधिकारी, नगरसेवकांचा झाला पक्षप्रवेश
जिंतूरचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रसाद बुधवंत यांच्यासह धनगर समाज उन्नती मंडळ परभणी जिल्हाअध्यक्ष अनंतराव कोरडे, कवडा सरपंच राजेश चव्हाण, नगरसेवक नियाजू खान गफुर खान उर्फ न्याजुलाला, नगरसेवक अफसर बेग, नगरसेवक सेलू रहीम खान पठाण, सामाजिक कार्यकर्ते याया खान, अयुफभाई सदर, सय्यद मुस्ताफा आदींचा आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव सुरेश भैया नागरे, जिल्हाकार्याध्यक्ष नानासाहेब राऊत, विशालराव बुधवंत, शहराध्यक्ष बासू खान, सुधाकर नागरे आदी उपस्थित होते.
जिंतूर विधानसभेची लढत कशी होती?
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांच्या विरुद्ध राष्ट्रवादीचे उमेदवार विजय भांबळे यांच्यामध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली होती. निवडणुकीत अवघ्या चार हजारांच्या मताधिक्याने मेघना बोर्डीकरांचा विजय झाला होता. आता २०२४ ची विधानसभा निवडणूक लवकरच होणार आहे. जिंतूर विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांना तब्बल १ लाख ५०० मते मिळाली. तर महादेव जानकर यांना ८ हजार ७८५ मते मिळाली. संजय जाधव यांना जिंतूर विधानसभा मतदारसंघातून जानकरांपेक्षा १२ हजार ६४५ एवढे मते जास्त मिळाली. या मतदारसंघाचे नेतृत्व भाजप आमदार मेघना बोर्डीकर करत आहेत. मेघना बोर्डीकर यांना भाजपकडून परभणी लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व देखील देण्यात आले होते. पण तरीदेखील जिंतूर विधानसभा मतदारसंघ जानकरांसाठी तोट्याचा ठरला.