Parbhani: राज्यात लोकसभेनंतर आता विधानसभेचे पडघम वाजू लागले आहेत. प्रत्येक पक्षानं आपापल्या मतदारसंघात संभाव्य उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. मराठवाड्यात सध्या काँग्रेस कार्यकारणीच्या बैठका सुरु असून परभणीतील 4 ही जागांवर काँग्रेसकडून इच्छूक उमेदवारांची यादी मागवण्यात आली आहे. पाथरीत काँग्रेसकडून सुरेश वरपूडकर यांची उमेदवारी जाहीर केल्याने महाविकास आघाडीत संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. 2019 मध्ये पाथरीची जागा काँग्रेसने जिंकली. त्यामुळे काँग्रेसने या जागेवर दावा ठोकला असून राष्ट्रवादी अजित पवार गटातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेले बाबजानी दुर्राणी यांनीही पाथरीतून विधानसभेची उमेदवारी मागत तयारी सुरु केल्याने नांदेडच्या पाथरी मतदारसंघात बाबाजानी दुर्राणी की वरपूडकर असा पेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीसमोर निर्माण झालाय.
नांदेडच्या कार्यक्रमात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उमेदवारी जाहीर केलीय. तर इतर जागा सोडवण्याबाबत पक्षाच्या बैठकीत निर्णय होईल असे वरपूडकर म्हणालेत.
पवारांच्या राष्ट्रवादीत गेल्यानंतर पाथरीतून उमेदवारीसाठी हलचाली
अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश घेतला. तब्बल चार दशकांपासून बाबाजानी हे शरद पवारांच्या नेतृत्वात काम करत होते. पवारांचे जूने समर्थक मानले जाणारे दुर्राणी राष्ट्रवादीया स्थापनेनंतर परभणीचे पहिले जिल्हाध्यक्ष होते. पाथरी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी २००४ ते २००९ या काळात प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर विधानपरिषदेवर ते दोनवेळा आमदार होते.
पाथरीच्या ग्रामीण भागात कार्यकर्त्यांची मोठी फळी असून स्थानिक विरोधक असलेले सईद खान शिवसेना एकनाथ शिंदे गटात असल्याने त्यांच्याकडून बाबाजानींनी कोंडी झाली होती. त्यामुळे अजित पवारांच्या गटात त्यांनी प्रवेश केला. आता ते पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेले असून पाथरी विधानसभेसाठी उमेदवारीसाठी त्यांनी तयारी सुरु केली आहे.
दोनवेळा पाथरीचे उमेदवार असणारे वरपूडकर काँग्रेसकडून उमेदवार
मराठवाड्यातील काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसचे अनेक नेते भाजपमध्ये जातील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. यात परभणीतील सुरेश वरपूडकर यांनी पक्षाशी निष्ठा ठेवत कुठेही न जाण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस पक्षातून राजकीय करिअरची सुरुवात केलेल्या वरपूडकरांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला होता. राष्ट्रवादीत असताना परभणी जिल्ह्यात त्यांचा शब्द अंतिम असायचा, असे सांगितले जाते. अंतर्गत गटबाजीचे कारण देत त्यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर तत्कालीन काँग्रेस पक्षाचे नेते अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर पाथरी विधानसभेची त्यांना उमेदवारीही मिळाली. मात्र, त्यांचा त्यात पराभव झाला होता. २०१९ मध्ये काँग्रेसने दुसऱ्यांदा संधी दिल्यानंतर त्यांना या मतदारसंघात अखेर विजय मिळाला होता. आता तेही पाथरी मतदारसंघासाठी काँग्रेसकडून उमेदवार असताना पाथरीच्या जागेवर कोणाचा वरचष्मा राहणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे.