मुंबई : बीड जिल्ह्यातील सरपंच हत्याप्रकरणावरील आरोप-प्रत्यारोप आणि राजकीय फैरी झडत असताना आमदार सुरेश धस यांच्याकडून काही अभिनेत्रींच्या नावाचा उल्लेख करण्यात आला. परळीचा सांस्कृतिक पॅटर्न असे म्हणत आमदार धस यांनी मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव घेतल्यानंतर ह्या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे. सुरेश धस यांच्या वक्तव्यानंतर प्राजक्ता माळीनेही (Prajakta mali) पत्रकार परिषद घेऊन गेल्या दीड महिन्यांपासून सोशल मीडियातून होत असलेल्या अपप्रचारामुळे आपण त्रस्त असल्याचे सांगितले. एका लोकप्रतिनिधीने माझ्या नावाचा उल्लेख केल्याने मला पत्रकार परिषद घेऊन बोलावं लागत असल्याचे सांगत तिने महिलांवर होणाऱ्या चारित्रहननच्या मुद्द्यावरुन सर्वांनाच लक्ष्य केलं. त्यानंतर, प्राजक्ता माळीचं बाजू घेत अनेक सिनेकलाकार व महिला नेत्याही पुढे आल्या आहेत. आता, भाजप नेत्या आमि मंत्री पंकजा मुंडे (Pankaja munde) यांनी ट्विट करुन प्राजक्ता माळीचं समर्थन केलंय. तसेच, आमदार सुरेश धस यांना जोरदार टोला लगावला आहे. 


पंकजा मुंडे यांनी प्राजक्ता माळी यांचं कुठेही नाव घेतलं नाही. पण काल पाहवलं नाही... असे म्हणत कालच्या प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेवर भाष्य केलंय. तसेच, सर्वच महिलांना कणखर राहायला हवं, स्वत:ला कणखर बनवायला हवं, असे म्हणत साहित्यिक भाषेतून संदेश दिला आहे.  


''शक्ती शिवाय कुठल्याही नकारात्मक ऊर्जेचा संहार होऊ शकला नाही.. त्रिदेव ही थकले की शक्तीचे आवाहन लागायचे.. त्रिदेव कोणालाही वरदान द्यायचे आणि शक्ती संहार करायची. 'दुर्दैवी घटना'हे कलयुगातील स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी काहीही करणाऱ्यांसाठी खाद्य आहे. भावना कुठे आहेत? चिमुकल्यांचे बलात्कार, पाशवी अत्याचार आणि निघृण हत्या या थांबवणे शक्य आहे ना पण कायद्याने, नियमाने !! ते राहिले बाजूला नुसती चिखल फेक. दुर्दैवाने soft targetआहे स्त्री आणि तिचे सत्व,'' असे म्हणत पंकजा मुंडे यांनी स्त्रियांच्या चारित्र्यावर शिंतोंडे उडवणे किती सहज आणि खालच्या पातळीवर जाऊन केले जात असल्याचे आपल्या ट्विटमधून सूचवलं आहे. तसेच, कालच्या घटनेचा संदर्भ बोलताना प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ साहित्यिक शब्दात पवित्र प्राजक्ताची पवित्र फुले, असे म्हटलं आहे. 


काल पाहवलं नाही, पवित्र प्राजक्ताची पवित्र फुलं सांडताना आजच्या समाजाची जमीन ते धारण करण्यासाठी संवेदनशील आहे? तरी एका शक्तीची दुसऱ्या शक्तीला आपसूक साथ मात्र राहावी. Be strong n make us proud you all #women असे म्हणत पंकजा मुंडेनी प्राजक्ता माळीला धीर देण्याचं काम केलंय.