मुंबई: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवरुन (Maharashtra politics) एकीकडे सुप्रीम कोर्टात (Supreme Court) मोठ्या घडामोडी घडत आहेत. तर दुसरीकडे राजकीय पक्षांमध्येही उलथापालथी होत आहेत. विधानसभा निवडणुकीला (Vidhan Sabha Election) वर्ष बाकी असताना नेत्यांच्या पक्षबदलीला सुरुवात झाल्याची चित्र आहे. एकीकडे शिंदे गटात (Shinde Camp) प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत असताना, आता शिंदे गटाला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. शिंदे गटाचे माजी आमदार पांडुरंग बरोरा (Pandurang Barora) यांनी शिवसेनेला (Shiv Sena) जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला आहे. पांडुरंग बरोरा गुरुवारी 19 ऑक्टोबरला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Sharad Pawar NCP) प्रवेश करणार आहेत. 


पांडुरंग बरोरा यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम उद्या संध्याकाळी पाच वाजता होणार आहे.  शहापूरमध्ये (Shahapur)  राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दौलत दरोडा (Daulat Darora) आहेत. दौलत दरोडा हे अजित पवार गटात (Ajit Pawar) आहेत. त्यामुळे आता शहापूरमध्ये येत्या निवडणुकीत दौलत दरोडा यांच्यासमोर पांडुरंग बरोरा यांचं आव्हान उभं राहतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे. 


दुसरीकडे पांडुरंग बरोरा यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार चाचपणी सुरु केल्याची चर्चा आहे. लवकरच शरद पवार हे शहापुरात जाहीर सभा घेणार आहेत. 


कोण आहेत पांडुरंग बरोरा? (Who is Pandurang Barora) 


पांडुरंग बरोरा हे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होते.  राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते विधानसभेवर गेले होते. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. 1980 पासून पवार कुटुंबासोबत असलेल्या शहापूरमधील बरोरा कुटुंबाने पक्षासोबत फारकत घेतली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला होता. 


त्यावेळी शिवसेनेचे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत बरोरा यांची जवळीक होती. त्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.


शरद पवार गटाच्या लोकसभानिहाय बैठका (Sharad Pawar NCP meeting)


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गटाच्यावतीने पक्षात फूट पडल्यानंतर, आता लोकसभा निवडणुकांसाठी (Lok Sabha) उमेदवारांची चाचणी सुरु झाली आहे. पवार गटाने आज लोकसभानिहाय बैठकांचं आयोजन केलं आहे. बैठकीसाठी राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार 18 ऑक्टोबर आणि गुरुवार 19 ऑक्टोबर रोजी लोकसभानिहाय मतदारसंघाचा आढावा प्रदेश पक्ष कार्यालय मुंबई येथे घेण्यात येणार आहे .


दिनांक 18 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर, हातकणंगले, रावेर, बारामती, शिरूर, सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघांबाबत चर्चा होईल. तर दिनांक 19 ऑक्टोबर रोजी दिंडोरी,अहमदनगर, हिंगोली, वर्धा, अमरावती, बीड, भिवंडी आणि जालना लोकसभा मतदारसंघनिहाय चाचपणी केली जाईल.


अजित पवार गटाची मुंबईत बैठक (Ajit Pawar NCP meeting)


दरम्यान, तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मुंबई विभागाची आज महत्वपूर्ण बैठक होत आहे. आज संध्याकाळी 4 वाजता वांद्रे येथील MET कॉलेजमध्ये ही बैठक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ यांच्या नेतृत्वात ही बैठक होणार आहे. यावेळी मुंबई विभागामधील जिल्हाध्यक्ष,तालुका अध्यक्ष,वार्ड अध्यक्ष यांची नेमणूक या बैठकीत केली जाणार आहे. 


आगामी महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कामाला लागलेला आहे.  


संबंधित बातम्या 


MLA Missing | राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडा बेपत्ता असल्याची शहापूर पोलीस स्थानकात तक्रार