मुंबई : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) एकीकडे ओबीसीमधून (OBC Reservation ) मराठ्यांना सगेसोयरेंचं आरक्षण (Maratha Reservation) मिळावं, यासाठी आग्रही असताना दुसरीकडे ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांनी ओबीसींच्या बाजूने आवाज उठवला. लक्ष्मण हाके यांनी उपोषण सुरु करण्यामागचं नेमकं कारण काय, याबाबत एबीपी माझाचा 'माझा कट्टा' या खास कार्यक्रमात खुलासा केला आहे. हाकेंच्या मते, मराठा समाज मागास का नाही, राजकीय पाठिंब्याच्या आरोपांवर हाकेंचं काय म्हणणं आहे, उपोषणासाठी मराठवाड्याची निवड का केली, मुख्यमंत्री शिंदेंवर हाके नाराज आहेत का, भुजबळांनी ओबीसींचा राजकीय पक्ष काढावा का, या आणि अशा विविध प्रश्नांची उत्तरे लक्ष्मण हाके यांनी माझा कट्ट्यावर दिली आहेत. 


स्वत:च्या आरक्षणासाठी ओबीसी बांधवदेखील मैदानात


विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांकडून वातावरण निर्मितीला सुरुवात झाली आहे. एकीकडे निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली असताना मनोज जरांगे पाटील आणि मराठा बांधवांना ओबीसीतूनच आरक्षण हवं, असा आग्रह कायम ठेवला आहे. तर आता स्वत:च्या आरक्षणासाठी ओबीसी बांधवदेखील मैदानात उतरले आहेत. ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह 10 दिवस उपोषण केलं. मंत्र्‍यांच्या शिष्टमंडळाने त्यांच्यासोबत संवाद साध्यल्यानंतर त्यांनी उपोषण स्थगित केलं. पण, उपोषण स्थगित केलं असलं तरीही आरक्षण  आंदोलन थांबवलं नसल्याचं लक्ष्मण हाकेंनी म्हटलं आहे. 


लक्ष्मण हाकेंनी उपोषण सुरु करण्यामागचं नेमकं कारण काय?


लक्ष्मण हाके यांनी उपोषण सुरु करण्यामागचं नेमकं कारण सांगताना म्हटलं आहे की, एका बाजूला जरांगे पाटलांचं सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशा संदर्भात जे उपोषण सुरु होतं आणि अध्यादेशा अध्यादेशासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आम्ही संवेदनशील पद्धतीने यावरती काम करत आहोत, असं सांगितल्याने ही एक भीती मनामध्ये होती आणि त्याचबरोबर ओबीसीचे आरक्षण जे आता दहा टक्के रिझर्वेशन दिले किंवा कुणबी नोंदी, ज्या युद्ध पातळीवरती शासनाच्या संरक्षणामध्ये या महाराष्ट्रामध्ये कुणबी नोंदी म्हणजेच जात प्रमाणपत्र हे शासनाच्या संरक्षणामध्ये महाराष्ट्रामध्ये वाटली जात होती. याच्यावर आमचा ऑब्जेक्शन होतं. या दोन गोष्टी पॅरेलल चालत होत्या. 


त्याचवेळी जरांगे पाटील असं म्हणायचे की आम्ही कुणबी नोंदी द्वारे मी मराठा समाज ओबीसीमध्ये 80 टक्के घुसवलाय आणि आता सगसोयऱ्यांचा अध्यादेश आणून उरलेले 20 टक्के देखील मी ओबीसीमध्ये घुसवणार आहे, ही भूमिका वेळोवेळी जरांगे सांगत होते. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि प्रत्येक पक्षाचे प्रमुख म्हणत होते की, ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. आता यामध्ये एक तर जरांगे खोटं बोलत होते किंवा शासन खोटं बोलत होतं. दोघांपैकी एक जण खरं किंवा खोटं बोलत असल्याची भावना माझ्या मनामध्ये होती, असं हाके यांनी यावेळी सांगितलं आहे.


एक राज्य मागास आयोगामध्ये काम केलेला माणूस, संविधानिक तरतुदी, मागसलेपण कसं चेक करायचं, मागास कुणाला म्हटलं जातं आणि महाराष्ट्रापुरता  विचार करायचा झाला, जर मराठ समाज मागस ठरत असेल, तर असा कोणता समाज आहे जो पुढे गेल्यामुळे मराठा समाज पिछाडला गेला आहे, अशी काय परिस्थिती महाराष्ट्रामध्ये उद्धभवली, ही भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला स्वस्थ बसू देत नव्हती, म्हणून उपोषण सुरु केल्याचं लक्ष्मण हाके यांनी सांगितलं आहे.


पाहा व्हिडीओ : OBC आंदोलक लक्ष्मण हाके 'माझा कट्टा'वर