मुंबई: महाराष्ट्रात सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात असताना राज्यात आरक्षणाची गरजच नाही, असे ठाम विधान करणारे मनसेप्रमुख राज ठाकरे हे आता एकाचवेळी मराठा आणि ओबीसी आरक्षण (OBC Reservation) आंदोलकांच्या रडारवर आले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरुन आक्रमक झालेल्या मराठा आंदोलकांनी सोमवारी संध्याकाळी धाराशिवमध्ये राज ठाकरे थांबलेल्या हॉटेलमध्ये गोंधळ घातला होता. त्यानंतर आता ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनीही राज ठाकरे यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आरक्षणाबाबतच्या विचारांची मला कीव येते. राज ठाकरे हे मनसे पक्ष संपवायला मराठवाड्याच्या दौऱ्यावर निघाले आहेत का? राज ठाकरे तुम्ही खरंच प्रबोधनकार ठाकरे यांच्या घराण्यात जन्मलात का?, असा संतप्त सवाल लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.


यावेळी लक्ष्मण हाके यांनी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या वर्गीकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत भाष्य केले. वर्गीकरण तेव्हा करावं जेव्हा ठोस डेटा असेल. वर्गीकरण घटनाविरोधी आहे. ते अमलात आणताना अडचणी येतील. क्रीमिलेअर सर्वांना लावाल तर आरक्षण संपुष्टात येईल. न्यायालयाने एससी आणि एसटी आरक्षणाला का हात लावला कळलंच नाही, असे हाके यांनी म्हटले. तसेच ओबीसी आरक्षणाच्या लढाईत कुणबी बांधवांनी सहभागी झाले पाहिजे, असे आवाहनही हाके यांनी केले. कुणबी बांधवांचा लढ्यातला रोल काय? कुठे आहेत नेते?. कुणब्यांनी लढ्यात यायला हवं, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले.


शरद पवारांना ओबीसी समाजाचं अंत:करण कळालं असतं तर आतापर्यंत दोन-तीनवेळा पंतप्रधान झाल असते: लक्ष्मण हाके


शरद पवार हे नेहमी इलेक्शन मोडमध्ये असतात. ओबीसी समाजाचं व्याकरण ते समजतात, पण त्यांचं अंत:करण समजत नाही. ते समजले असते तर शरद पवार आतापर्यंत दोन-तीन वेळा देशाचे पंतप्रधान झाले असते. जरांगे म्हणजे पवार आणि पवार म्हणजे मुख्यमंत्री हे झालंय. पुढे येऊ घातलेल्या निवडणुकीत ही हेच असेल. मराठ्यांनी फडणवीस यांच्या बंगल्यावर जाण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरावर जायला हवे. मुख्यमंत्र्‍यांनी ओबीसी आरक्षणाबाबत काय भूमिका घेतली आहे? ओबीसी संघटित आहेत, तो पुढेही संघटित होईल. 18 ऑगस्टला नांदेड आणि 19 ऑगस्टला सांगलीत ओबीसी मेळावा आहे. महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री ओबीसीच असेल, असा दावा लक्ष्मण हाके यांनी केला.


VIDEO: लक्ष्मण हाकेंची राज ठाकरेंवर टीका






आणखी वाचा


राज ठाकरे अन् मराठा आंदोलकातील वाद थांबता थांबेना,धाराशिवमध्ये प्रतिकात्मक पुतळा जाळला,पोलिसांची माध्यम प्रतिनिधींना धक्काबुक्की