OBC Political Reservation Maharashtra : सर्वोच्च न्यायालयाने आज ओबीसी समाजाला मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने बांठिया अहवाल मान्य केला असून राज्यातील निवडणुका त्यानुसार घेण्याचे निर्देश दिले आहे. यामुळे आता ओबीसी राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. याचाच जल्लोष आता पुणे, नाशिक, पंढरपूर, उस्मानाबादसह संपूर्ण राज्यभरात साजरा केला जात आहे. ओबीसी बांधव एकमेकांना पेढे भरवत, फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करत आहेत.
ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाचे फटाके फोडून स्वागत
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामधील निवडणुकीतील ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याने अहमदनगर शहरातील सावता माळी महासंघाच्या वतीने पेढे वाटत, फटाके फोडून न्यायाल्याच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. अहमदनगर शहरातील महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून युवकांनी एकमेकांना पेढे भरवले. सर्वोच्च न्यायालयाने आज बांठिया अहवाल मान्य करून राज्यातील निवडणुका त्यानुसार घेण्याचे निर्देश दिलेत, त्यामुळे खऱ्या अर्थाने आज ओबीसी समाजाला न्याय मिळाला अशी, भावना यावेळी सावता माळी महासंघाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
सोलापुरात कमेकांना पेढे भरवत आंदोत्सव साजरा
ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर ओबीसी समाज बांधवतर्फे सोलापूरातील आंबेडकर चौकात आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे. यावेळी ओबीसी बांधवानी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले.
उस्मानाबादमध्येही फटाक्यांची आतषबाजी
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर उस्मानाबादमध्येही जल्लोष पाहायला मिळाला. येथील ओबीसी बांधवानी न्यायालयाच्या निर्णयावर आनंद व्यक्त करत फटाक्यांची आतषबाजी केली आणि पेढे वाटून जल्लोष व्यक्त केला.
ओबीसी आरक्षणाच्या निर्णयानंतर भाजपकडून औरंगाबादमध्ये जल्लोष
न्यायालयाच्या निर्णयानंतर औरंगाबादमध्ये भाजपकडून जल्लोष साजरा करण्यात आला आहे. शहरातील उस्मानपुरा भागातील भाजपच्या कार्यालयासमोर हा जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी आमदार अतुल सावे आणि भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांची गर्दी पाहायला मिळाली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला.
इतर महत्वाच्या बातम्या:
OBC Political Reservation : ओबीसींना बांठिया आयोगानुसार राजकीय आरक्षण लागू.. दोन आठवड्यात रखडलेल्या निवडणुका जाहीर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
OBC Reservation : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीचा पंधरा महिने टाईमपास, देवेंद्र फडणवीसांचा आरोप