Laxman Hake slams Ajit Pawar: अजित पवार हे चोरांचे, कारखानदारांचे आणि दरोडेखोरांचे सरदार आहेत. मी त्यांना उघडनागडं केल्याशिवाय शांत बसणार नाही, अशा शब्दांत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीकास्त्र सोडले. अमोल मिटकरी (Amol Mitkari) आम्हाला क्रिमिनल जाती म्हणतात. सुरुवात अमोल मिटकरीने केली आणि शेवट आम्ही करणार, असेही हाके (Laxman Hake) यांनी ठणकावून सांगितले. ते बुधवारी 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
भाजपने अजित पवार यांना सोबत घेतले. उद्या सुप्रिया सुळे आणि त्यानंतर रोहित पवार यांनाही सोबत घेत आहेत, त्यांना बाहेर थांबू द्या ना. हे काय गौडबंगाल आहे, असा सवाल लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला. मला एक गाडी गिफ्ट दिली होती. माझ्या जुन्या गाडीला खूप मेंटेनन्स होता. लोकांनी गाडी दिल्यानंतर त्याच दरम्यान सारथीला निधी उपलब्ध होतो, महाज्योतबाबत दुजाभाव केला जातो म्हणून मी अर्थमंत्री याला उद्देशून एक पत्रकार परिषद केली. त्यानंतर अमोल मिटकरी यांनी माझ्या गाडीचा नंबर वाय झेड ठेवा, अशा पद्धतीचे त्याने वक्तव्य केले होते. मी उद्या अमोल मिटकरी यांच्या गावात जाणार आहे, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले.
माझ्याकडे गाडीसाठी चालक असताना अनेकांनी त्याला मदत केली, माझ्याकडे पैसे नसताना सुद्धा. मी काही पवार कुटुंबासारखा व्यापारी नाही, माझा कुठं कारखाना नाही किंवा रोहित पवार सारखी बारामती ऍग्रो नाही. अजितदादा पवार यांच्याबदल मंत्रिमंडळात नाराजी आहे. माझं भाजपला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक विचारणं आहे. लढायला आम्ही आणि तूप रोटी खायला पवार फॅमिली. हा काय न्याय आहे? भाजपने आधी अजित पवारांना सोबत घेतले. आता सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांना का घेत आहेत, त्यांना बाहेर थांबू द्या, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले.
लक्ष्मण हाकेंचा मालक दुसराच, जरांगेंवर टीका केल्याने ओबीसींचे नेते बनले: अमोल मिटकरी
अमोल मिटकरी आणि लक्ष्मण हाके यांच्यातील शाब्दिक वाद विकोपाला गेला आहे.अनेक दिवसांपासून या दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. हाके हा बारा छिद्राचा पाना आहे. तो कुठून-कुठे आला या सगळ्याची माहिती माझ्याकडे आहे. तू अजितदादांवर टीका करुन बापापर्यंत जातो, आम्हालाही मायबापापर्यंत जाता येते. पण आमचे ते संस्कार नाहीत. आम्ही तुझी जीभ हासडून हातात देऊ शकतो, पण आम्हाला तुला तेवढं मोठं करायचं नाही. लक्ष्मण हाके ओबीसींचा नेता कसा झाला, राज्य मागासवर्ग आयोगाचं सदस्यपद कुठून मिळवलं, फॉर्च्युनर गाडी घेण्याइतका पैसा तुझ्याकडे कुठून आला? लक्ष्मण हाकेचा मालक दुसराच आहे, त्याने तुकडा टाकल्यामुळे तो पवार कुटुंबावर भुंकत आहे. लक्ष्मण हाकेंचा मालक दुसराच आहे, तो कोण आहे, हे आम्चया लक्षात आले आहे. मनोज जरांगे यांच्यावर टीका करुन लक्ष्मण हाके ओबीसींचा नेता बनला आहे, अशी टीका मिटकरी यांनी केली होती.
आणखी वाचा