मुंबई: मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर निवडून आले असले तरी मतमोजणीबाबत ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांनी आक्षेप घेतला होता. यासंदर्भात वनराई पोलिसांनी वायकर (Ravindra Waikar) यांचे मेहुणे मंगेश पंडीलकर (Mangesh Pandilkar) आणि निवडणूक आयोगाचा एनकोर ऑपरेटर दिनेश गुरव (Dinesh Gurav) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आता तपासात पंडीलकर ईव्हीएम यंत्राशी जोडलेला मोबाइल फोन वापरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्यानुसार इतर उमेदवारांचे जबाब नोंदवले असून, लवकरच याप्रकरणी अटक वॉरंट जारी करण्यात येणार आहे.


मिड-डे दैनिकाच्या माहितीनुसार, मंगेश पंडीलकर ज्या फोनवर बोलत होता, तो फोन ईव्हीएम यंत्राला जोडलेला होता. ईव्हीएम मशीन अनलॉक करण्यासाठी एक ओटीपी जनरेट होतो. हा ओटीपी ज्या मोबाईल फोनवर आला होता, तोच फोन मंगेश पंडीलकर याच्या हातात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गोरेगावमधील नेस्को मतमोजणी केंद्रावर याच मोबाईल फोनचा वापर करुन 4 जून रोजी सकाळी ईव्हीएम मशीन अनलॉक करण्यात आल्या होत्या. 


वनराई पोलिसांनी याप्रकरणी मंगेश पडीलकर आणि दिनेश गुरव यांना नोटीस पाठवली असून त्याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. तसेच पोलिसांनी मंगेश पडीलकर याने वापरलेला फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला आहे. या फोनमधील डेटा आणि फिंगरप्रिंटची तपासणी केली जाणार आहे. 


नेमकं काय घडलं?


नेस्को मतमोजणी केंद्रावर 4 जूनला रवींद्र वायकर आणि अमोल कीर्तिकर हे दोघेही उपस्थित होते. पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात ईव्हीएम यंत्रातील मतांची मोजणी झाल्यानंतर  इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवलेल्या पोस्टल बॅलेटची  मोजणी करण्यात आली. ही पोस्टल बॅलेट सिस्टीम अनलॉक करण्यासाठी दिनेश गुरव याने ज्या मोबाईलवर ओटीपी पाठवला होता, तोच फोन मंगेश पंडीलकरच्या हातात होता. ईव्हीएम यंत्रांतील मतांची मोजणी सुरु असताना अमोल कीर्तिकर आघाडीवर होते, त्यांच्याकडे जवळपास 2000  इतके मताधिक्य होते.  मात्र, इलेक्ट्रॉनिक बॅलेट सिस्टीममधील मतांची मोजणी सुरु झाल्यावर रवींद्र वायकर आघाडीवर गेले आणि कीर्तिकर यांचा अवघ्या 48 मतांनी पराभव झाला.


पोलिसांचं म्हणणं काय?


या सगळ्या प्रकरणावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामप्यारे राजभर यांनी भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, आम्ही मंगेश पंडीलकर ज्या फोनवर बोलत होता, तो फोन तपासणीसाठी पाठवला आहे. या फोनमधील कॉल रेकॉर्डसची तपासणी केली जाईल. या मोबाईल फोनचा वापर अन्य कोणत्या कारणासाठी झाला का, हेदेखील पाहिले जाईल. आम्ही इतर उमेदवारांचे जबाब नोंदवले असून मंगेश पंडीलकर आणि दिनेश गुरव यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. या दोघांनाही चौकशीसाठी पोलीस ठाण्यात यावे लागेल. ते दोघेजणही आम्हाला सहकार्य करत आहेत. त्यांनी सहकार्य करण्याचे थांबवल्यास दोघांविरोधात अटक वॉरंट जारी केले जाईल, असे पोलिसांनी सांगितले.


आणखी वाचा


रवींद्र वायकर 48 मतांनी जिंकले, आधी विजयी घोषित केलेले अमोल किर्तीकर हरले, सुपर ओव्हरला लाजवणारा थरार!