नवी दिल्ली : भाजपनं नवी दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत 70 पैकी 48 जागांवर विजय संपादन करत सत्ता मिळवली. तर, दोन टर्म स्वबळावर सत्तेत असणाऱ्या आम आदमी पार्टीला पराभव स्वीकारावा लागला. काँग्रेसला तर खातं देखील उघडता आलं नाही. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीनं विधानसभा निवडणुकीत 2020 ला विजयी झालेल्या 62 पैकी 36 आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली होती. तर, आपच्या 5आमदारांनी पक्षांतर करुन निवडणूक लढवली होती. भाजपच्या सहा आमदारांनी देखील पुन्हा निवडणूक लढवली होती. म्हणजेच एकूण 47 आमदारांनी पुन्हा विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यापैकी 25 आमदरांना पराभवाचा धक्का बसला.
भाजपचे सर्व आमदार विजयी
भाजपनं 2020 च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या 8 पैकी 6 आमदारांनी निवडणूक लढवली होती. 2025 च्या विधानसभा निवडणुकीत देखील त्यांनी विजय मिळवला. म्हणजेच भाजपचा स्ट्राईक रेट 100 टक्के राहिला. भाजपचे ते आमदार पुन्हा विजयी होत विधानसभेत पोहोचलेत.
आपला धक्का 22 विद्यमान आमदार पराभूत
आम आदमी पार्टीनं 62 पैकी 36 आमदारांना पुन्हा तिकीट दिलं होतं. त्यापैकी 22 आमदार पराभूत झाले. यामध्ये अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया या दिग्गजांचा समावेश आहे. आपनं पुन्हा उमेदवारी दिलेल्यांपैकी केवळ 14 आमदार विधानसभेत परत पोहोचले आहेत. जे नेते विजयी झालेत त्यामध्ये अतिशी, गोपाळ राय, मुकेश कुमार अल्हावट यांसह इतरांचा समावेश आहे.
आपच्या ज्या विद्यमान आमदारांना पराभव स्वीकारावा लागला. त्यामध्ये अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, सौरभ भारद्वाज यांचा समावेश आहे. याचा अर्थ नवी दिल्लीतील मतदारांमध्ये आप विरोधात असंतोष होता हे स्पष्ट होतं.
आम आदमी पार्टी सोडून पक्षात आलेल्या तीन आमदारांना भाजपनं उमेदवारी दिली होती.यामध्ये कैलाश गहलोत, करतारसिंग तनवर आणि राज कुमार आनंद यांचा समावेश होता. मात्र, कैलाश गहलोत आणि करतारसिंग तन्वर हे दोघे विजयी झाले. काँग्रेसच्या चिन्हावर आपचे अब्दुल रेहमान आणि धर्मपाल लाक्रा हे निवडणूक लढले. मात्र, ते देखील पराभूत झाले.
आम आदमी पार्टीला 70 पैकी 22 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळं आपला विरोधी पक्षात बसावं लागेल. आपनं 2013 मध्ये निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश केला होता. 2013 ला आपला 28 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसच्या मदतीवर ते नवी दिल्लीत सत्तेत आले होते. ते सरकार 49 दिवस टिकलं होतं. 2015 मध्ये आपला 67 जागा मिळाल्या तर 2020 मध्ये 62 जागा जिंकल्या होत्या.
इतर बातम्या :