Jitendra Awhad On Suresh Dhas: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्यावर निशाणा साधला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी सुरेश धस यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ पोस्ट करत सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात (Somnath Suryavanshi) राजकारण करुन पोळी भाजू नका, असा सल्लाही दिला आहे. 

जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?

दुसर्‍याच्या घरातील माणसाचा खून झाला तर तिसर्‍याने येऊन, "जाऊ द्या, त्याला माफ करा", हे बोलणे खूप सोपे असते. पोटच्या पोराचा जीव गेल्यानंतर आईला काय वाटत असेल, हेही जर बोलणार्‍यास कळू नये याला काय म्हणावे. सगळ्याच ठिकाणी राजकारण करून आपली पोळी भाजण्याची सवय वाईटच असते. अर्थात,  हा ज्याचा-त्याचा विचार आहे. पण, कुठल्याही परिस्थितीत कुणालाही माफी मिळणार नाही. ज्यांनी सोमनाथला मारलंय, त्यांना कायद्याचा मार बसेलच, याची खात्री आम्ही देतो. एवढेच जर आपल्यामध्ये क्षमायाचनेचे भाव असतील तर कृपया आपण हिमालयात जाऊन साधूसंत व्हावे आणि वाल्मिक कराडलाही माफ करावे, अशी टीकाही जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. 

तिघांच्याही खुनाला माफी नाही- जितेंद्र आव्हाड

सोमनाथ सुर्यवंशी छोट्या समाजाचा, मागे पाठबळ नाही, म्हणून सोमनाथला मारणाऱ्यांना माफ करावे, ही भावनाच मूळात वर्णवर्चस्ववादी आहे. खून हा खून असतो अन् खुनाला माफी नाही. हा खूनच आहे...अक्षय शिंदेचा खूनच आहे; सोमनाथ सुर्यवंशीचा खूनच आहे आणि संतोष देशमुखचाही खूनच आहे. तिघांच्याही खुनाला माफी नाही, असंही जितेंद्र आव्हाड एक्सवर पोस्ट करत म्हणाले. 

तुम्ही सोमनाथला पुन्हा जिवंत करा, फिट्टमफाट हिशोब होईल- सुषमा अंधारे

देवेंद्र फडणवीस नावाच्या अत्यंत अपयशी गृहमंत्र्यांच्या प्रेमात आकंठ बुडालेले सुरेश धस सांगतात, तसं चला आपण सोमनाथ हत्या प्रकरणातील पोलिस अधिकाऱ्यांना मोठ्या मनाने माफ करु...सुरेश धससाहेब तेवढ्याच मोठ्या मनाने तुम्ही सोमनाथला पुन्हा जिवंत करा..., फिट्टमफाट हिशोब होईल...असं म्हणत सुषमा अंधारे यांनी सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला. 

विटंबना करणाऱ्या दत्ता पवार यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा; सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची मागणी 

दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्याच्या मागणीसाठी आंबेडकरी अनुयायाकडून परभणी ते मुंबई लॉंग मार्च काढण्यात आला होता. हा लॉन्ग मार्च काल नाशिक येथे परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि भाजप आमदार सुरेश धस यांच्या मध्यस्थीने थांबवण्यात आला. त्या ठिकाणी आंदोलकांच्या 15 मागण्यांना पूर्ण करण्यासंदर्भात आश्वासन देण्यात आले. तसेच एक पोलीस अधिकारी आणि तीन कर्मचाऱ्यांना निलंबन ही करण्यात आले मात्र हे आश्वासन आणि काही पोलिसांचे निलंबन आम्हाला मान्य नसून सोमनाथच्या मृत्यूला दोषी असलेल्या पोलिसांवर मनुष्यवाधाचा गुन्हा दाखल करावा. तसेच संविधानाची विटंबना करणाऱ्या दत्ता पवार यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशा मागण्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई आणि भावाने केल्या आहेत जोपर्यंत या मागण्या मान्य केल्या जात नाहीत तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाहीत असे ते म्हणाले आहेत. 

संबंधित बातमी:

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुखांचा मारेकरी कृष्णा आंधळेला धनंजय मुंडेंनी लपवून ठेवलंय; मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप