Sanjay Raut : महाराष्ट्रात नुकतंच विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन (Maharashtra Monsoon Assembly Session) पार पडलं. या अधिवेशनात केंद्रीय यंत्रणांचा राज्यात होत असलेला वापर आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांना झालेली अटक यावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरतील अशी चर्चा होती. मात्र अधिवेशनाच्या पूर्ण कालावधीत संजय राऊत यांचा मुद्दा एकदाही चर्चेला आला नसल्याचं समोर आलं. यावरुनच आता राऊत एकटे तर पडले नाहीत ना अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत. शिवसेनेचे धारदार तलवार आणि वार सोसणारी पक्षाची ढाल. बाळासाहेबांचा हा सैनिक बोलायला लागला की पक्षाला हत्तीच बळ मिळायच पण राऊतांना अटक झाली आणि तोफाही थंडावल्या. कारण पावसाळी अधिवेशनात शिवसेनेच्या एकाही वाघाने राऊतांबद्दल आवाज उचलला नाही आणि म्हणूनच चर्चा सुरु झाली ती म्हणजे राऊत एकटे पडले की काय? खासदार संजय राऊत यांना अटक होऊन महिना उलटला. महाविकास आघाडी आपल्या कामात मग्न झाली. महाविकास आघाडीच्या निर्मितीपासून ती यशस्वीपणे पुढे जावे यासाठी बलशाली भाजपला एकाकी अंगावर घेण्याचं काम संजय राऊत यांनी केलं. पण हिच महाविकास आघाडीही अधिवेशनात राऊतांबद्दल चिडीचूप दिसली पण उद्धव ठाकरेंना पुन्हा महाविकास आघाडीला सावरायचा प्रयत्न केला.
संजय राऊत यांच्या एकाकी पडल्याची नेमकी चर्चा कशी सुरु झाली याचा थोडा अभ्यास केला असता लक्षात येणारी बाब म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात, संजय राऊत यांच्या अटकेचा साधा निषेध देखील विरोधकांकडून नोंदवण्यात आला नसल्याचं समोर आलं. कदाचित त्यामुळेच त्यांचे भाऊ सुनील राऊत देखील सभागृहात फार कमी काळ पाहायला मिळाले.
स्व-संरक्षणासाठी विरोधकांचा आवाज क्षीण?
खरंतर या आधिवेशनात संजय राऊतांची अटक, नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्यावरील कारवाई, अब्दुल सत्तार यांच्यावर टीईटी घोटाळ्यातील आरोप, बलात्कार प्रकरणात आरोप झालेले संजय राठोड या मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरण्याची संधी होती. परंतु या मुद्द्यावर विरोधकांचा आवाज पूर्णपणे क्षीण झाल्याचं पाहायला मिळालं.
मागील काही दिवसांत ईडी कारवाईला घाबरुन भाजपमध्ये सहभागी होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. शिंदे गटातील काही आमदारांच्याबाबत देखील अशीच चर्चा आहे. काँग्रेस नेते अस्लम शेख यांच्यावर देखील कारवाईची शक्यता आहे. त्यापूर्वीच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट चर्चेत आहे. त्यामुळे स्व-संरक्षणासाठीच विरोधकांचा आवाज तर क्षीण झाला नाही ना असे प्रश्न निर्माण होत आहेत
पवारांनीही राऊत कुटुंबियांची भेट घेणं टाळलं
संजय राऊत यांची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय अशीच ओळख अलीकडच्या काळात झाली होती. त्यामुळे शरद पवार नक्कीच राऊत कुटुंबियांच्या भेटीला जातील अशी शक्यता असताना, आज महिना उलटला तरी पवार यांनी राऊत कुटुंबियांची भेट घेण्याचं टाळलं आहे. त्यामुळे केंद्रीय यंत्रणांच्या दबावाखाली सगळेच विरोधक दबले असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.